देशाच्या अर्थव्यवस्थेतील उभारीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारे औद्योगिक उत्पादन दरातील घसरण आणि महागाई दरात वाढीच्या गुरुवारच्या आकडेवारीने चिंतातुर भांडवली बाजारातील पडझड शुक्रवारी आणखी विस्तारल्याचे आढळून आले. सेन्सेक्स २५६.४२ अंशांनी घसरून २५,६१०.५३ वर दिवसअखेर विसावला. जागतिक स्तरावरील प्रतिकूल घडामोडींनी बाजारातील घसरगुंडीस हातभार लावला.
शुक्रवारअखेरचा सेन्सेक्सचा स्तर हा गत दोन महिन्यांतील त्याचा नीचांक स्तर आहे. शिवाय निर्देशांकांची साप्ताहिक स्तरावरील ही सलग तिसरी घसरण आहे. नाना प्रकारच्या प्रतिकूल घटना-घडामोडींच्या माऱ्याने घायाळ बाजारात सेन्सेक्सने सरलेल्या सप्ताहात ६५४.७१ अंश (२.४९ टक्के) आणि निफ्टी ५० निर्देशांकाने १९२.०५ अंश (२.४१ टक्के) झीज सोसली आहे.
बुधवारच्या मुहुर्ताच्या विशेष व्यवहारातील सकारात्मक उभारीचा अपवाद केल्यास, दोन्ही निर्देशांकांसाठी शुक्रवारचा सलग सहावा घसरणीचा दिवस होता. अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हच्या आगामी महिन्यांतील संभाव्य व्याजदर वाढीच्या पाश्र्वभूमीवर जागतिक स्तरावर अनेक महत्त्वाच्या जिनसांसह सोन्यासह प्रमुख धातूंच्या किमती प्रचंड गडगडल्याने सर्वच प्रमुख भांडवली बाजार आज नरम होते. आशियाई आणि युरोपीय बाजारात गुंतवणूकदारांनी मोठय़ा प्रमाणात विक्री केल्याने तेथील निर्देशांक गटांगळी खाताना दिसून आले.