सेन्सेक्स, निफ्टीची पाच वर्षांतील सर्वोत्तम झेप

अखेरच्या दिवशी शतकी तेजीसह भांडवली बाजाराने गेल्या पाच वर्षांतील सर्वोत्तम निर्देशांक झेप २०१४ मध्ये नोंदविली आहे.

अखेरच्या दिवशी शतकी तेजीसह भांडवली बाजाराने गेल्या पाच वर्षांतील सर्वोत्तम निर्देशांक झेप २०१४ मध्ये नोंदविली आहे. निर्देशांकांचे उच्चांकी स्तर पाहणाऱ्या या वर्षांत गुंतवणूकदारदेखील २८ लाख कोटी रुपयांनी श्रीमंत झाले आहेत, तर केंद्रात नव्याने आलेल्या पूर्ण बहुमताच्या आर्थिक सुधारणांच्या विश्वासावर या कालावधीत विदेशी गुंतवणूकदारांनीही १६ अब्ज डॉलरचा निधी स्थानिक बाजारात ओतला आहे.
२०१४ मध्ये सेन्सेक्समध्ये ६,३२८.७४ अंशांची वाढ झाली आहे. टक्केवारीत ती २९.८९ आहे. २००९ नंतरची भांडवली बाजाराची वर्षांतील ही सर्वोत्तम कामगिरी गणली गेली आहे. सेन्सेक्स वर्षभरात २८,८२२.३७ या सर्वोच्च टप्प्यावर २८ नोव्हेंबर रोजी होता. तर ३१ डिसेंबर २०१३ रोजी सेन्सेक्स २१,१७०.६८ वर होता. निफ्टीने मावळत्या वर्षांत ३१.३९ टक्के व १,९७८.७० अंश वाढ नोंदविली आहे. वर्षभरात देशातील सर्वात मोठय़ा भांडवली बाजाराने ८,६०० च्या पुढील टप्पा अनुभवला आहे.
यामुळे बाजारातील गुंतवणूकदारदेखील सरत्या वर्षांत २८ लाख रुपयांनी श्रीमंत झाले आहेत. बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांची मालमत्ता ३१ डिसेंबर २०१४ अखेर ९८.३६ लाख कोटी रुपये झाली आहे. सलग चौथ्या वर्षांत गुंतवणूकदारांची बाजारातील गुंतवणूक वाढली आहे. २९ हजाराच्या सर्वोच्च टप्प्याला पोहोचलेल्या बाजारात गुंतवणूकदारांनी १०० कोटी रुपयांची मालमत्ताही अनुभवली आहे. बाजारात ५,५४२ कंपन्या सूचिबद्ध आहेत.
२०१४ च्या अखेरच्या व्यवहारात, बुधवारी सेन्सेक्स जवळपास १०० अंशांनी, ९५.८८ अंश वाढीसह २७,५०० नजीक, २७,४९९.४२ पर्यंत पोहोचला, तर निफ्टीने ३४.४५ अंश वाढीसह ८,२८२.७० पर्यंत मजल मारली. सेन्सेक्स सलग चौथ्या सत्रात वधारताना निर्देशांकाला वर्षअखेर आठवडय़ाच्या उच्चांकावर नेऊन ठेवले. यापूर्वीचे चार दिवस २९०.८१ अंश घसरणीचे राहिले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bse sensex rises 95 pts ends 2014 with best annual gain in 5 yrs