सप्ताहाच्या पहिल्या दिवशीच्या व्यवहारात सेन्सेक्सने ९८ तर निफ्टीने २७ अंशांची किरकोळ वाढ नोंदविली असली तरी शेअर बाजारात मिश्र कल पहायला मिळाला. दोन्ही निर्देशांक अनुक्रमे १९,६७३ व ५,९७१ वर विसावले. कोणत्याही अमूक क्षेत्रातील समभाग फारसे वधारले अथवा मोठय़ा प्रमाणात घसरलेले दिसून आले नाही. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रीय निर्देशांकाची चढती कमान (१.८८%) सलग पाचव्या दिवशी कायम राहिली. टीसीएस, इन्फोसिससह सेन्सेक्समधील रिलायन्सच्या समभाग मूल्यांमध्ये मोठी भर पडली. सेन्सेक्स आता तीन आठवडय़ाच्या उच्चांकावर पोहोचला आहे. दरम्यान, विदेशी चलन व्यवहारात डॉलरच्या तुलनेतील रुपयाची घसरण सोमवारी सलग तिसऱ्या सत्रातही कायम राहिली. २४ पैशांच्या घसरणीसह रुपया ५४.१८ पर्यंत खाली आला.