सलग पाच सत्रातील वाढीनंतर बुधवारपासून सुरू झालेली भांडवली बाजारातील घसरण गुरुवारी मोठय़ा प्रमाणात विस्तारली. एकाच व्यवहारात जवळपास ३०० अंशांची आपटी घेतल्याने मुंबई निर्देशांक २० हजाराच्याही खाली आला. महिन्यातील सौदापूर्तीच्या अखेरच्या दिवशी आघाडीच्या समभागांची जोरदार विक्री झाल्याने सेन्सेक्स २८५.९२ अंश घसरणीस १९,८०४.७६ पर्यंत खाली आला. १.४२ टक्के घट नोंदविणाऱ्या प्रमुख निर्देशांकाची ही १६ जुलैनंतरची किमान पातळी आहे. राष्ट्रीय शेअर बाजारानेही ८७.३० अंश घसरण नोंदवित निफ्टीला ५,९०७.३० वर आणून ठेवले. बाजार आता गेल्या दोन आठवडय़ाच्या तळाला पोहोचला आहे.
भांडवली बाजाराने सलग पाच दिवस वाढ राखत ४५१ अंशांची भर घातली होती. रुपयाला सावरण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने उचलेल्या नव्या उपाययोजनांनी बुधवारी त्याला प्रथमच २११ अंशांच्या घसरणीच्या रुपात खीळ बसली. ही घसरण गुरुवारी वाढली. जागतिक शेअर बाजारातील अस्थिरता आणि रिझव्‍‌र्ह बँकेच्या निर्णयाचा दबाव यावेळी दिसून आला. ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांक घसरणीत अग्रेसर (-३.३३%) होता. गेल्या सत्रात वर्षांच्या उच्चांकाला स्पर्श करणाऱ्या आयटीसी आणि हिंदुस्थान यूनिलिव्हरच्या समभागांची विक्री झाली. गेल्या तिमाहीत १८ टक्के नफा मिळवूनही आयटीसीचा समभाग आज ४.५७ टक्क्यांनी घसरला. तर हिंदुस्थान यूनिलिव्हरच्या समभागाला कालच्या तुलनेत ३.२० टक्के कमी भाव मिळाला. आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक या बँक समभागांची घसरण आजही कायम राहिली. जोडीला रिलायन्स, सन फार्मा, लार्सन अ‍ॅन्ड टुब्रो, विप्रो, महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र, ओएनजीसी, टाटा पॉवर, टाटा स्टील, भेल, सिप्ला असे घसरणीच्या यादीत राहिले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये १३ पैकी ११ मध्ये घट नोंदली गेली. तर सेन्सेक्समधील केवळ पाच समभागांचे मूल्य वधारले.

रुपया आणखी उंचावला
मुंबई : डॉलरच्यात तुलनेतील भारतीय चलनातील भक्कमता सलग दुसऱ्या दिवशी परकी चलन व्यासपीठावर नोंदवली गेली. रुपया किरकोळ २ पैशांनी मात्र तेजीसह आज बंद झाला. सकाळच्या व्यवहारापासूनच रुपयाचा प्रवात तेजीवर स्वार होता. दिवसभरात रुपया ५८.७७ र्पयच उंचावला. तर व्यवहारा दरम्यान तो ५८.३६ पर्यंत घसरला. आठवडय़ाभरात भारतीय चलन एक टक्क्याने वधारले आहे. रिझव्‍‌र्ह बँकेच्या उपाययोजनांचा भारतीय चलनावरील दृश्य परिणाम बुधवारीदेखील दिसून आला होता. यावेळी चलन ६३ पैशांनी भक्कम होत ५९ च्या नजीक पोहोचले होते. कालच्या व्यवहाराखेर रुपया ५९.१३ वर स्थिरावला. गेल्या महिन्याभरातील ती दिवसातील सर्वात मोठी झेप होती. रुपयाने याच महिन्याच्या सुरुवातीला ६१.२१ हा ऐतिहासिक नीचांक नोंदविला आहे.