संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आज (शनिवार) केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर करण्यास सीतारामन यांनी सुरुवात केली. अर्थसंकल्पमध्ये सीतारामन यांनी करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. नवी करप्रणाली लागू करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. अडीच तासांहून अधिक वेळ सीतारामन यांनी भाषण केले. मात्र भाषण संपण्याच्या १० ते १५ मिनीट आधी त्यांना थकवा लागल्यासारखे झाल्याने त्यांनी काही मिनिटांची विश्रांती घेतली.

सकाळी ११ वाजता सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी दोन तास ४१ मिनिटे आपले भाषण केले. आपल्या भाषणामध्ये त्यांनी इंग्रजीबरोबरच हिंदी, संस्कृत, फ्रेन्च, काश्मीरी, तामिळ अशा अनेक भाषांचा वापर केला. अनेकदा त्यांच्या भाषणादरम्यान गोंधळ झाला. एकदा तर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीच “अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर तुम्हाला मत मांडण्याची संधी देण्यात येईल,” असं सांगत गोंधळ घालणाऱ्या खासदारांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

सकाळी ११ वाजता सुरु केलेले भाषण पावणे दोनच्या आसपास संपले. मात्र त्याआधी म्हणजेच अडीच तासानंतर सितारामन यांना थकवा आल्यासारखे वाटू लागले. त्यावेळी त्यांनी आपले भाषण थांबवले आणि “मला आणखीन पाणी हवे आहे,” असं लोकसभेतील कर्मचाऱ्यांना सांगितले. त्यानंतर कर्मचाऱ्याने ग्लासभर पाणी आणून दिल्यावर पाणी प्यायल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा भाषणाच्या कागदांकडे पाहिले आणि दोन पाने शिल्लक राहिल्याची खातरजमा करुन पुन्हा भाषण वाचण्यास सुरुवात केली. सितारामन यांच्या बाजूच्या खुर्च्यांवरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अमित शाह, राजनाथ सिंह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी बसले होते. राजनाथ सिंह यांनी सीतारामन यांना भाषण आटोपतं घेण्याचा इशारा केला. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये सीतारामन यांनी आपले भाषण संपवले.

किर्ती चिदंबरम यांचाही आक्षेप

देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र किर्ती चिदंबरम यांनीही ट्विटवरुन भाषण जास्त वेळ चालल्याबद्दल नाराजी व्यक्त करत भाषणाचा वेळ निश्चित केला पाहिजे असं ट्विटवर म्हटलं. “अर्थसंकल्पाच्या भाषणाला वेळ मर्यादा ठरवून द्यायला हवी,” असं किर्ती यांनी ट्विट केलं आहे.

सीतारामन यांच्या लांबलेल्या भाषणामुळे सभागृहातील अनेक खासदार कंटाळ्याचे चित्र दिसत होते.