Budget 2020: शनिवार असूनही शेअर बाजार सुरु कसा काय ?

सामान्यत: शनिवार आणि रविवार शेअर बाजार बंद असतो

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात काय घोषणा होतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अर्थसंकल्पात होणाऱ्या घोषणांचा परिणाम थेट शेअर बाजारावर होताना दिसत असतो. सामान्यत: शनिवार आणि रविवार शेअर बाजार बंद असतो. पण अर्थसंकल्प मांडला जात असल्याने शेअर बाजारशी संबंधित लोकांनी व्यवहार सुरु ठेवण्याचं आवाहन केलं होतं. यामुळेच आज शेअर बाजार शनिवार असूनही सुरु ठेवण्यात आला आहे. २०१५ मध्येही अर्थसंकल्प शनिवारी मांडला जात असल्याने शेअर बाजार सुरु ठेवण्यात आला होता. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा दुसरा अर्थसंकल्प आहे. याआधी जुलै महिन्यात निर्मला सीतारमन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला होता.

अरुण जेटली यांनी बदलली प्रथा
२०१६ पर्यंत फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी अर्थसंकल्प सादर करण्याची प्रथा होती. मात्र माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१७ पासून एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प  मांडण्याची प्रथा सुरु केली. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्येही हीच प्रथा सुरु आहे. त्याशिवाय रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प मांडण्याची प्रथाही बंद करण्यात आली. त्याचप्रमाणे रेल्वे आणि सर्वसाधारण अर्थसंकल्प एकत्रच सादर केली जातात.

शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्समध्ये घसरण
दरम्यान शेअर मार्केट सुरु होताच सेन्सेक्स १४० अंकांनी घसरुन ४०,५७६ वर पोहोचला आहे. तर निफ्टी १२६.५० अंकांनी घसरण झाली आहे. सेन्सेक्सच्या ३० पैकी १८ शेअर्स तर निफ्टीच्या ५० पैकी ४२ शेअर्समध्ये घसरण झाल्याचं पहायला मिळत आहे.

शेअर बाजारशी संबंधित घोषणांची शक्यता
केंद्र सरकार दीर्घकालीन भांडवली नफा कर संबंधी दिलासा देऊ शकतं. शेअर खरेदी केल्यानंतर एक वर्षांनी ते विकले आणि त्याच्यावर एक लाखांहून जास्त फायदा मिळाला तर त्याच्यावर १० टक्के कर लागतो. हा कर रद्द केला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. अन्यथा याचा कालावधी वाढवून दोन वर्ष केला जाऊ शकतो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Budget 2020 share market working on saturday sensex down by 140 points sgy

ताज्या बातम्या