तेजीवाल्यांचा जोम;‘सेन्सेक्स’ ६० हजारांवर

तेजीवाल्यांनी बाजारावरील पकड घट्ट केल्याने सलग चौथ्या सत्रात प्रमुख निर्देशांकांनी वरच्या दिशेने दौड कायम ठेवली.

तेजीवाल्यांचा जोम;‘सेन्सेक्स’ ६० हजारांवर
संग्रहित छायाचित्र

मुंबई : तेजीवाल्यांनी बाजारावरील पकड घट्ट केल्याने सलग चौथ्या सत्रात प्रमुख निर्देशांकांनी वरच्या दिशेने दौड कायम ठेवली. आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या ओसरलेल्या किमती आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून खरेदीचा जोर वाढल्याने, बुधवारी चार महिन्यांच्या कालावधीनंतर सेन्सेक्स पुन्हा ६०,०००च्या पातळीपुढे पोहोचला. आशियातील सकारात्मक कल आणि डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्यानेही निर्देशांकाला बळ मिळाले.

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ४१७.९२ अंशांनी वधारून, ६०,२६०.१३ पातळीवर स्थिरावला. सेन्सेक्सने ५ एप्रिल २०२२ नंतर पुन्हा ६० हजार अंशांची पातळी ओलांडली असून, सार्वकालिक उच्चांकांपासून तो २,००० अंश दूर आहे. बरोबरीने राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ११९ अंशांची वाढ झाली आणि तो १८ हजारांच्या उंबरठय़ावर पोहोचला. सलग सातव्या सत्रात वाढ नोंदविताना, बुधवार दिवसअखेर निफ्टी १७,९४४.२५ वर स्थिरावला.

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी लावलेल्या समभाग खरेदीच्या सपाटय़ामुळे भांडवली बाजारात तेजी कायम आहे. गेले काही महिने महागाईच्या ओझ्याखाली दबलेल्या अर्थव्यवस्थेने दाखविलेल्या गतीमुळे परदेशी गुंतवणूकदार पुन्हा आकर्षित झाले आहेत. तरीही प्रमुख देशांसाठी अजूनही महागाईचा प्रश्न कायम आहे. खनिज तेलाच्या किमतीतील नरमाई आणि उत्पादन घटकांच्या किमती घटल्याने परदेशी गुतंवणूकदारांमध्ये पुन्हा उत्साहाचे वातावरण आहे, असे निरीक्षण जिओजित फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

सेन्सेक्समध्ये बजाज फिनसव्हने ५.७४ टक्क्यांच्या वाढीसह सर्वाधिक तेजी साधली. त्यापाठोपाठ बजाज फायनान्स, भारती एअरटेल, टेक मिहद्र, एचसीएल टेक्नॉलॉजीज, एनटीपीसी, एचयूएल आणि विप्रोचे समभाग वधारले. दुसरीकडे महिंद्रा अँड महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, मारुती, टाटा स्टील, कोटक बँक, पॉवर ग्रिड आणि टायटनच्या समभागात प्रत्येकी १.०७ टक्क्यांपर्यंत घसरण झाली. सेन्सेक्समधील आघाडीच्या ३० कंपन्यांपैकी २३ कंपन्यांचे समभाग सकारात्मक पातळीवर स्थिरावले.

रुपयात २९ पैशांनी वाढ

मुंबई : भांडवली बाजारातील तेजीवाल्यांच्या सरशीचे अनुकरण करीत बुधवारी रुपया २९ पैशांनी वाढून अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ७९.४५ पातळीवर बंद झाला. बाजारात विदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढत असल्याचे हे द्योतक असल्याचे चलन बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितले. चलन बाजारात बुधवारच्या व्यवहाराची सुरुवात रुपयाने ७९.३२ च्या भक्कमतेसह रुजू झाला. व्यवहारात सत्रात स्थानिक चलन ७९.२६ पर्यंत उंचावले, मात्र पुढे ७८.४८ पर्यंत घसरणीने त्याने काहीशी चिंता निर्माण केली. मात्र व्यवहारअखेरीस तुलनेने त्यात २९ पैशांची वाढ नोंदविली.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bulls sensex 60000 market indexes international level ysh

Next Story
Gold-Silver Price on 17 August 2022: सोने-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचा भाव
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी