देशव्यापी उद्योजकांची आघाडीची संघटना असलेल्या भारतीय उद्योग महासंघाच्या (सीआयआय) पश्चिम विभागीय अध्यक्षपदी आर. मुकुंदन यांची तर उपाध्यक्षपदी चेतन तांबोळी यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड २०१३-१४ या आर्थिक वर्षांसाठी आहे. आर. मुकुंदन हे टाटा समूहातील टाटा केमिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. १९९० मध्ये टाटा प्रशासकीय सेवा विभागात रुजू झालेले मुकुंदन हे गेल्या २३ वर्षांपासून टाटा समूहात आहेत. दिल्ली येथून व्यवस्थापन क्षेत्रातील पदवी प्राप्त करणाऱ्या मुकुंदन यांनी रुरकीच्या आयआयटीमधून अभियंता पदवीही घेतली आहे. उपाध्यक्षपदी निवड झालेले चेतन तांबोळी हे ‘स्टीलकास्ट लिमिटेड, इंडिया’ चे अध्यक्ष व विभागीय संचालक आहेत. स्टील आणि अॅलोय स्टील कास्टिंग उत्पादन प्रकारातील निर्मिती या कंपनीमार्फत केली जाते. भारतीय औद्योगिक महासंघाच्या गुजरात राज्य परिषदेचे अध्यक्षपदही तांबोळी यांनी भूषविले आहे.
‘ओपल’ची विक्री जाळ्यात विस्ताराची योजना; ‘एनएसई एसएमई’ मंचावर १३ कोटींची भागविक्री
भिंतीवरील आणि टेबलांवरील घडय़ाळांची अभिजन नाममुद्रा असलेल्या ‘ओपल’चे देशांतर्गत विक्री जाळे १००० डिलर्सपर्यंत विस्तारण्यासाठी तसेच उत्पादनाच्या घडणीतील आयातीत घटक कमी करून रचनेच्या स्थानिकीकरणावर गुंतवणुकीसाठी पुणेस्थित ‘ओपल लक्झरी टाइम प्रॉडक्ट्स लिमिटेड’ने आवश्यक निधी मिळविण्यासाठी भांडवली बाजारात प्रवेश घोषित केला आहे. कंपनीने राष्ट्रीय शेअर बाजारच्या ‘एनएसई एसएमई’ मंचावर प्रारंभिक खुल्या भागविक्रीद्वारे १३ कोटी रुपये उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. ही भागविक्री २५ मार्च ते २८ मार्च या दरम्यान प्रत्येकी रु. १३० ते रु. १३५ अशा किंमतपट्टय़ामध्ये बुक-बिल्डिंग प्रक्रियेने होत आहे. क्वार्ट्झ तंत्रज्ञानाच्या पाठबळावर आधारीत आणि डिझाइनिंग इन-हाऊस कौशल्य असलेली ‘ओपल’ ही भिंतीवरील घडय़ाळांची प्रीमियम श्रेणीतील भारतात उपलब्ध असलेली एकमेव नाममुद्रा असल्याचे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक समीर गुजर यांनी सांगितले. पुण्यात मुख्यालय असलेल्या या कंपनीने दोन वर्षांपूर्वी आपला उत्पादन प्रकल्प रूरकी (उत्तराखंड) येथील करमुक्त क्षेत्रात हलविला आहे. आगामी काळात उत्पादन प्रक्रियेचे अधिकाधिक स्वदेशीकरण, विक्री जाळ्यात विस्तार तसेच ब्रॅण्डला बळकटी देणाऱ्या जाहिरातींवर तसेच प्रायोजकत्व वगैरे धाटणीच्या प्रोत्साहनपर उपक्रमांवर भर देण्याचे नियोजन असल्याचे गुजर यांनी स्पष्ट केले.
‘इंडिया टेक’द्वारे पुण्यात अक्षय्य ऊर्जेवर आधारीत परिषद
अपारंपरिक तसेच अक्षय्य ऊर्जास्त्रोतांमध्ये कार्यरत कंपन्या व विशेषज्ज्ञांचे व्यासपीठ व संलग्न उत्पादने व सेवांचा आविष्कार असलेल्या ‘रिन्यूटेक इंडिया २०१३’ या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व परिषदेचे ‘इंडिया टेक फाऊंडेशन’ने भारत सरकारच्या नवीन आणि अक्षय्य ऊर्जा मंत्रालयाच्या सहयोगाने आयोजन केले आहे. यंदाची ही प्रदर्शन व परिषदेची सहावी आवृत्ती असून, ते येत्या ११ ते १३ एप्रिल दरम्यान चिंचवड, पुणे येथील ऑटो क्लस्टर एक्झिबिशन अॅण्ड कन्व्हेंशन सेंटर येथे योजण्यात आले आहे. सोलर एनर्जी सोसायटी ऑफ इंडिया, विंड एनर्जी असोसिएशन ऑफ इंडिया आणि वर्ल्ड बायो एनर्जी असोसिएशन आदी संघटनांनी आयोजनात हातभार लावला आहे. दोन दिवसांची परिषद आणि तीन दिवसांचे प्रदर्शन असे स्वरूप असलेल्या ‘रिन्यूटेक इंडिया २०१३’चा मुख्य भर हा ‘१२ व्या पंचवार्षिक योजनेतून अतिरिक्त ३०,००० मेगाव्ॉटची स्थापित क्षमता अक्षय्य ऊर्जा स्रोतातून कशी मिळविता येईल?’ या विषयावर केंद्रीत असेल. केंद्रीय अक्षय्य ऊर्जामंत्री डॉ. फारूक अब्दुल्ला यांच्या हस्ते परिषद व प्रदर्शनाचे उद्घाटन होत असून, सरकारचे विविध वरिष्ठ अधिकारी आणि अक्षय्य ऊर्जेला वाहिलेल्या सार्वजनिक उपक्रमांचे प्रमुख त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ऊर्जाविषयक तज्ज्ञांचा सद्य अक्षय्य ऊर्जाविषयक स्थितीवर चर्चा-परिसंवादांमध्ये सहभाग असेल. इंडिया टेक फाऊंडेशन (आयटीएफ)चे अध्यक्ष इंद्र मोहन  यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे परिषदेतून अक्षय्य ऊर्जेच्या क्षेत्रातील सध्याची प्रगती, भविष्याविषयक दृश्य आणि त्यासाठी आवश्यक धोरणात्मक व नियामक मुद्दय़ांचा परामर्श घेतला जाईल. प्रकल्प आणि यंत्रसामग्री या दोन्ही दृष्टीने पुणे हे निर्मिती उद्योगाचे मुख्य केंद्र बनले असून या ठिकाणी ऊर्जा आणि संलग्न प्रक्रिया उद्योगांची सुरू असलेली भरभराट पाहता ते भारतातील दुसरे मोठे औद्योगिक केंद्र बनून पुढे येण्याची क्षमता राखते, असे गौरवोद्गारही इंद्र मोहन यांनी काढले.