मोबाइलधारकांसाठी डोकेदुखी ठरलेल्या ‘कॉल ड्रॉप’च्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्याचा दाखला खुद्द दूरसंचार नियामकाने दिला आहे. २०१५च्या एप्रिल ते जून या दुसऱ्या तिमाहीत मोबाइल ‘कॉल ड्रॉप’चे प्रमाण २४.५९ टक्क्यांपर्यंत गेले आहे.
टूजी प्रकारातील सेवेवरील कॉल ड्रॉपचे प्रमाण जानेवारी ते मार्च या पहिल्या तिमाहीत १२.५० टक्के होते, तर थ्रीजी सेवेवरील मोबाइल कॉल ड्रॉपचे प्रमाण एप्रिल ते जून दरम्यान १६.१३ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. त्यात आधीच्या तिमाहीतील १५.९६ टक्क्यांच्या तुलनेत किरकोळ वाढ झाली आहे. वाढत्या कॉल ड्रॉपबाबतच्या मोबाइल ग्राहकांच्या तक्रारीवरून भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने सेवा पुरवठादार कंपन्यांना दंड आकारण्याचा इशारा दिला आहे. त्यातच कॉल ड्रॉपचे प्रमाण वाढत असल्याचे नियामकानेच दाखवून दिले आहे. नियामकाने जाहीर केलेल्या यंदाच्या आकडेवारीमध्ये एअरसेल, टाटा टेलिसव्र्हिसेस, बीएसएनएल अशा निवडक कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांच्या टूजी व थ्रीजी तंत्रज्ञानावरील मोबाइल सेवांचा अभ्यास त्यात केला गेला आहे. एकूण सरासरी कॉल ड्रॉपचे प्रमाण हे नियामकाने आखून दिलेल्या २ टक्के प्रमाणाच्या तुलनेत १.६४ टक्के राहिले आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत दूरसंचार कंपन्यांचा ढोबळ महसूल ०.३० टक्क्यांनी कमी होत तो ६५,०३० कोटी रुपये झाल्याचेही नियामकाने म्हटले आहे. जीएसएम तंत्रज्ञानावरील मोबाइल सेवा पुरवठादारांचा प्रति ग्राहक मासिक सरासरी महसूल (आरपू) १०७ रुपयांवरून १२६ रुपयांवर गेला आहे.