scorecardresearch

एअर इंडियाच्या प्रमुखपदी कॅम्पबेल विल्सन यांची नियुक्ती

एअर इंडियाच्या संचालक मंडळाने विल्सन यांच्या नियुक्तीला आवश्यक नियामक मंजुरीच्या अधीन राहून मान्यता दिली,

मुंबई : टाटा सन्सने गुरुवारी एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कॅम्पबेल विल्सन यांची नियुक्ती जाहीर केली.

एअर इंडियाच्या संचालक मंडळाने विल्सन यांच्या नियुक्तीला आवश्यक नियामक मंजुरीच्या अधीन राहून मान्यता दिली, असे कंपनीने गुरुवारी एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले. ५० वर्षे वयाचे विल्सन हे सिंगापूर एअरलाइन्सच्या पूर्ण मालकीची किफायती दरातील प्रवासी विमान सेवा स्कूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सध्या कार्यरत असून, या सेवा उद्योगातील तब्बल २६ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्याकडे आहे, असेही या प्रसिद्धी निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

टाटा सन्स आणि एअर इंडियाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या मते, आशियाईतील या क्षेत्रातील नामांकित नाममुद्रा घडविण्याच्या विल्सन यांच्या अनुभवाचा एअर इंडियाच्या पुनर्बाधणीच्या प्रक्रियेत निश्चितच फायदा होईल. एअर इंडियालाही जागतिक दर्जाची विमान सेवा म्हणून स्थान मिळवून देण्यासाठी सुरू झालेल्या या प्रवासात त्याच्यासोबत काम करण्यास आपण उत्सुक आहोत, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. या वर्षांच्या सुरुवातीला, टाटा सन्सने तुर्की एअरलाइन्सचे माजी अध्यक्ष इल्कर आयसी यांची एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्तीची घोषणा केली होती. तथापि, भारताशी संबंधित त्यांच्या भूमिका आणि दृष्टिकोनावरून वादंग निर्माण झाल्याने त्यांनी स्वत:च हा पदभार स्वीकारण्यापूर्वीच माघार घेत असल्याचे कळविले.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Campbell wilson appointed ceo and md of air india zws

ताज्या बातम्या