सेन्सेक्स ५९ हजारांपुढे!

सेन्सेक्समध्ये इंडसइंड बँक ७.३४ टक्क्यांसह सर्वाधिक प्रमाणात वाढला.

दलाल स्ट्रीटवर तेजीचे तुफान

मुंबई : भांडवली बाजारातील तेजीचे विक्रमी तुफान गुरुवारी ‘सेन्सेक्स’ला ५९ हजारांच्या अनोख्या टप्प्यापुढे घेऊन गेले. केंद्र सरकारने दूरसंचार क्षेत्राला दिलेली संजीवनी, वाहन व ड्रोननिर्मितीला चालना आणि गेले कैक वर्षे सरकारी बँकांच्या मानगुटीवर बसलेल्या अनुत्पादित कर्ज मालमत्तेच्या प्रश्नावरील आश्वासक उतारा म्हणून पाहिल्या जाणाऱ्या ‘बॅड बँके’च्या निर्मितीचा मार्ग खुला केला गेल्याचे दलाल स्ट्रीटने असे हर्षभरित स्वागत केले.

सलग तिसऱ्या दिवसात तेजीची घोडदौड कायम राखत, सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी गुरुवारी पुन्हा नव्या विक्रमी कळसाला गवसणी घातली. सेन्सेक्स प्रथमच ५९,००० अंशांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडण्यास यशस्वी झाला. दिवसाचे व्यवहार आटोपताना, ४१७.९६ अंशांची वाढ राखत तो ५९,१४१.१६ वर झेपावला.

तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ११०.०५ अंशवाढीने १७,६२९.५०च्या सार्वकालिक उच्चांकी पातळीवर दिवसअखेर स्थिरावला. सेन्सेक्स आणि निफ्टीने दिवसभरात अनुक्रमे ५९,२०४.२९ आणि १७,६७७.६० असे अत्युच्च टप्पे नोंदविले.

आर्थिक सुधारणांची कास धरत, केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी जाहीर केलेल्या निर्णयांचे बाजारात यथोचित प्रतिबिंब उमटले आणि लाभार्थी कंपन्यांच्या समभागांची चमकदार कामगिरी दिसून आली.

सेन्सेक्समध्ये इंडसइंड बँक ७.३४ टक्क्यांसह सर्वाधिक प्रमाणात वाढला. त्याचबरोबर आयटीसी, एसबीआय, रिलायन्स इंडस्ट्रीज, कोटक बँक, आयसीआयसीआय बँक आणि अ‍ॅक्सिस बँकेच्या समभागांची चांगली कामगिरी केली. मात्र टीसीएस, टाटा स्टील, टेक महिंद्र, भारती एअरटेल, एचसीएल टेक आणि डॉ. रेड्डीज १.३२ टक्क्यांपर्यंत घसरले. वरच्या टप्प्यावरील समभाग मूल्यापोटी त्यातील विक्रीचा मोहही गुंतवणूकदारांना टाळता आला नाही.

बँकांना मोठी मागणी

केंद्र सरकारने हाती घेतलेल्या सुधारणांमुळे प्रेरित होत भांडवली बाजाराने नवीन विक्रमी उच्चांक प्रस्थापित केला. आजच्या सत्रात बँकांचे समभाग सर्वाधिक तेजीत होते.  विशेषत: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे समभागांमध्ये जोरदार खरेदीमुळे तेजीला चालना मिळाली. ‘बॅड बँके’च्या स्थापनेची वाट खुली झाल्याने, बँकिंग क्षेत्र आगामी काळात चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे, असे जिओजित फायनान्शिअल सव्र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले.

दूरसंचार समभागांत उसळी 

अडचणीत असलेल्या दूरसंचार क्षेत्राला संजीवनी देणाऱ्या सरकारच्या मदतीने सलग दुसऱ्या सत्रात दूरसंचार कंपन्यांचे समभाग तेजीत होते. व्होडाफोन-आयडियाचा समभाग २५.९८ टक्क्यांनी वधारून ११.२५ रुपयांवर बंद झाला. दिवसभरात समभागाने २८.४४ टक्क्यांची उसळी घेतली होती. भारती एअरटेलच्या समभागाने सकाळच्या सत्रात २.५२ टक्क्यांची उसळी घेत ७४३.९० या ५२ आठवड्यांतील उच्चांकी पातळी गाठली. मात्र तेजी दिवसभर टिकू शकली नाही. नफावसुलीमुळे दिवसअखेर समभाग १.०२ टक्क्यांच्या घसरणीसह ७१८.१५ रुपयांवर स्थिरावला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Capital market fastest record central government telecommunication sector sensex akp