नवी दिल्ली : सणासुदीच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर सरलेल्या सप्टेंबरच्या आकडेवारीने वाहन उद्योग अनेक महिन्यांची मरगळ झटकून पूर्वपदावर येत असल्याचे संकेत दिले. जागतिक पातळीवर अर्धसंवाहकाचा (सेमीकंडक्टर) सुधारलेला पुरवठा आणि वाहन निर्मात्या कंपन्यांकडून वाढलेल्या वाहनाच्या पुरवठय़ामुळे सप्टेंबरमध्ये वाहन विक्रीत ११ टक्के वाढ नोंदवली गेली, अशी माहिती वाहन विक्रेत्यांची संघटना – फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन (फाडा) मंगळवारी दिली.

फाडाने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्यात १४ लाख ६४ हजार एकूण वाहनांची विक्री झाली आहे. गेल्यावर्षी याच महिन्यात (सप्टेंबर २०२१) १३ लाख १९ हजार ६४७ वाहनांची विक्री झाली होती. दसरा आणि दिवाळीसारख्या सणोत्सवामुळे चालू ऑक्टोबर महिन्यांतही विक्रीत चांगली वाढ होण्याची वाहन निर्मात्या कंपन्यांना आशा आहे. प्रवासी वाहनांच्या विक्रीसाठी आगामी सणाचा काळ  सर्वोत्कृष्ट असेल. तर ट्रॅक्टर आणि काही तीन चाकी वाहने वगळता, प्रवासी, वाणिज्य वाहने आणि दुचाकी यांसारख्या इतर सर्व विभागांनी सप्टेंबरमध्ये वर्षभरापूर्वीच्या कालावधीच्या तुलनेत चांगली कामगिरी नोंदवली. सरलेल्या महिन्यात प्रवासी वाहनांची विक्री १० टक्क्यांनी वाढून २ लाख ६० हजार वाहने झाली. सप्टेंबर २०२१ मध्ये २ लाख ३७ हजार वाहने विकली गेली होती.

सेमीकंडक्टरचा वाढलेला पुरवठा, वाहन निर्माता कंपन्यांकडून वाहनांची चांगली उपलब्धता, नवीन वाहनांचे सादरीकरण आणि नवीन तंत्रज्ञानामुळे ग्राहकांनी वितरकांकडे नवीन वाहनासाठी मोठय़ा प्रमाणावर नोंदणी केली आहे, अशी माहिती ‘फाडा’चे अध्यक्ष मनीष राज सिंघानिया यांनी दिली.

वाणिज्य वाहनांच्या विक्रीत १९ टक्के वाढ

सप्टेंबर महिन्यात ७१ हजार २३३ वाणिज्य वाहनांची विक्री झाली. त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत १९ टक्के वाढ झाली. गेल्या वर्षी याच काळात ५९,९२७ वाहने विकली गेली होती.

मारुतीअग्रेसर

सर्व वाहन निर्मात्यांमध्ये मारुती सुझुकीने सप्टेंबरमध्ये सर्वाधिक १ लाख ३ हजार वाहनांची विक्री केली. मागील वर्षीच्या याच महिन्यांत तिने ९९ हजार २७६ वाहनांची विक्री केली होती. ह्युंदाई मोटर आणि टाटा मोटर्सने गेल्या महिन्यात अनुक्रमे ३९ हजार ११८ आणि ३६ हजार ४३५ वाहनांसह अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान राखले. दुचाकींच्या क्षेत्रात, होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया आणि हिरो मोटोकॉर्पने सप्टेंबरमध्ये अनुक्रमे २ लाख ८४ हजार आणि २ लाख ५० हजार दुचाकींची विक्री केली. टाटा मोटर्सने वाणिज्य वाहन क्षेत्रात दबदबा कायम राखत २८ हजार ६१५ वाणिज्य वाहनांची विक्री केली. तर तीन चाकी वाहनांमध्ये बजाज ऑटो आघाडीवर राहिली असून, १९ हजार ४७४ तीन चाकींची विक्री केली.