घोटाळेग्रस्त बाजार मंच नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लि. (एनएसईएल) मध्ये स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून नियमांचे उल्लंघन सुरू आहे असा ठपका ठेऊन, या सर्व गैरव्यवहारांबाबत चौकशीत केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) कडूनही लक्ष घातले जाईल, असे गुरुवारी अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी स्पष्ट केले.
सुमारे १३,००० गुंतवणूकदारांचे ५६०० कोटी रुपये देण्यात असमर्थ ठरलेला हा वस्तू बाजार मंच गेल्या अनेक वर्षांपासून कोणत्याही नियमनाशिवाय सुरू होता याची कबुली देताना, त्याने स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून नियमांचे उल्लंघन केले आहे, असा ठपका अर्थमंत्री चिदम्बरम यांनी ठेवला. या मंचाविरुद्ध केंद्रीय अन्वेषण विभागाला भारतीय दंडविधान संहिता आणि अन्य कायद्याच्या उल्लंघनाबाबत तक्रार प्राप्त झाली असून, या तक्रारीनुसार तपासाला सुरूवातही झाली असल्याचे त्यांनी पत्रकारांना माहिती दिली.  
केंद्रीय अन्वेषण विभागासह, कंपनी व्यवहार खाते आणि वायदे बाजार आयोग  (एफएमसी) अशी त्रिस्तरीय चौकशी व कारवाई सुरू आहे. केंद्रीय अर्थसचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने केलेल्या शिफारसीप्रमाण सर्व कारवाई होत आहे, असे म्हणत अर्थमंत्र्यांनी हा विषय आपल्या अखत्यारित नसल्याची सबबही पुढे केली. तथापि अर्थसचिवांच्या समितीने आपला अहवाल अर्थमंत्र्यांना यापूर्वीच सादर केला आहे.
एनएसईएलवर अंतिम कारवाईचे अधिकार केंद्रीय अर्थखात्याचे असल्याचे  कंपनी व्यवहारमंत्री सचिन पायलट यांनी मुंबईतील दोन दिवसांच्या दौऱ्यांदरम्यान जाहीर केले होते. याबाबत केंद्रीय अर्थसचिव अरविंद मायाराम अध्यक्ष असलेल्या समितीने उपरोक्त यंत्रणांकडे तपासाची शिफारस केंद्रीय अर्थखात्याला केली आहे. समितीने आपला अहवाल अर्थ मंत्रालयाला सुपूर्द करण्यात आला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
याबाबत अर्थमंत्री चिदम्बरम यांनी सांगितले की, वायदे बाजार आयोगाच्या अखत्यारित एनएसईएलची नोंदणी नाही. व्यवसाय सुरू करण्यापूर्वीच त्याला काही अटी घालून (मर्यादित दिवसांचे वायदे व्यवहार करण्याची) सूट मिळाली होती. अनियमित आणि विनायास सुरू असलेल्या या मंचात गुंतवणूकदारांनी अंधविश्वासाने गुंतवणूक केली. गुंतवणूकदारांनी सुरुवातीला यातून खूप पैसा मिळविला आणि आता त्यांनीच तो गमावलाही आहे. मंच ज्या नियमांच्या अधीन राहून व्यवसाय करत असल्याचा दावा करत होते ते सारे धुळीस मिळविले गेले आहेत.
अर्थमंत्री म्हणाले की, मायाराम समितीने आपल्याला सादर केलेल्या अहवालात एनएसईएलवर केंद्रीय अन्वेषण विभाग, केंद्रीय कंपनी व्यवहार खाते तसेच वायदे बाजार आयोग यांना तपास करण्याची शिफारस केली आहे. या यंत्रणा आता यात लक्ष घालणार असून एनएसईएलकडून नियमांचे उल्लंघन झाले अथवा नाही ते तपासून कारवाई करतील. भांडवली बाजार नियामक सेबी आणि वायदे बाजार मंचालाही आपण यावर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. वायदे बाजाराचा अहवाल येताच या यंत्रणा तपास सुरू करतील.