प्रत्येक तिनांतून एक ‘युनिकॉर्न’ घडेल असा सरकारचा प्रयत्न

केंद्र सरकार माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील ३०० नवउद्यमींना (स्टार्ट-अप) चालना देण्यासाठी कार्यक्रम आखणार आहे. निवडक नवउद्यमींमधून १०० ‘युनिकॉर्न’ तयार करण्याची सरकारची योजना आहे. यासाठी नवउद्यमींना प्राथमिक निधी साहाय्य, मार्गदर्शन आणि बाजारपेठ उपलब्ध करण्यात येणार आहे. सरकारने निवडलेल्या नवउद्यमींना सहा महिन्यांसाठी मार्गदर्शन आणि ४० लाख रुपयांपर्यंत बीजभांडवल देण्यात येणार आहे.

‘सिलिकॉन व्हॅली’च्या धर्तीवर नवउद्यमींना चालना देण्यासाठी उत्पादन नावीन्यता, वाढ आणि वृद्धीसाठी ‘स्टार्टअप अ‍ॅक्सिलरेटर’ची संकल्पना विकसित करण्यात आली आहे, अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या विशेष सचिव ज्योती अरोरा यांनी दिली. ‘युनिकॉर्न’ म्हणजेच एक अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत व्यावसायिक पसारा वाढविणाऱ्या यशस्वी कंपन्या नवउद्यमी उपक्रमातून घडविण्याचे संख्यात्मक लक्ष्यही असल्याचे त्यांनी सांगितले.

आतापर्यंत २० पेक्षा जास्त नवउद्यमींना मार्गदर्शन करण्यात आले आहे. जेव्हा नवउद्यमींच्या कल्पना प्रत्यक्ष उत्पादनांमध्ये रूपांतरित होत असतात तेव्हा त्यांच्या या प्रवासात मार्गदर्शनाची सर्वाधिक गरज असते, असे माहिती-तंत्रज्ञान आणि दूरसंचारमंत्री अश्विानी वैष्णव म्हणाले.

‘नवउद्यमींसाठी निधीची कमतरता ही तितकीशी समस्या नाही. मात्र नवकल्पना प्रत्यक्षात आणताना म्हणजे उत्पादन घेताना किंवा कल्पनेचे वस्तू किंवा सेवेत रूपांतर करताना आवश्यक असलेले कौशल्य किंवा कुशल मनुष्यबळ न मिळणे हे बहुतेक नवउद्यमींसाठी मोठे आव्हान असते. जर या काळात आपण मदत करू शकलो तर त्यांचे नक्कीच मूल्यवर्धन होईल,’ असे वैष्णव म्हणाले.