नवी दिल्ली : चार महामार्ग प्रकल्पांसाठी निधी उभारण्यासाठी सरकार पुढील महिन्यात भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांना आजमावणार आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी दिली. इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (इन्व्हिट्स)च्या माध्यमातून सरकारकडून ही निधी उभारणी होईल आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी १० लाख रुपयांची गुंतवणूक मर्यादा असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रमुख रस्ते प्रकल्पांसाठी ही निधी उभारणी असल्याने, त्यायोगे गुंतवणूकदारांना ७ ते ८ टक्के खात्रीशीर परतावा मिळेल, अशी ग्वाही गडकरी यांनी ‘फिक्की’च्या एका कार्यक्रमात बोलताना दिली. गुंतवणूकदारांकडून सार्वजनिक रूपात निधी गोळा करण्यासाठी आणि ठरावीक कालावधीत रोख प्रवाह प्रदान करणाऱ्या मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी रचना करण्यात आलेले इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (इन्व्हिट्स) हे म्युच्युअल फंडांच्या धर्तीवरचे साधन आहे.

गडकरी म्हणाले की, रस्ते मंत्रालय पुन्हा एकदा ‘बांधा, वापरा, हस्तांतरित करा’ (बीओटी) प्रारूपांतर्गत रस्ते प्रकल्प सुरू करणार आहे. देशातील राष्ट्रीय महामार्गाची एकूण लांबी एप्रिल २०१४ मध्ये सुमारे ९१,२८७ किलोमीटरवरून सुमारे नोव्हेंबर २०२१ अखेर १,४०,९३७ किलोमीटपर्यंत वाढली आहे. २०२४ पर्यंत राष्ट्रीय महामार्गाची एकूण लांबी दोन लाख किलोमीटपर्यंत नेण्याचे लक्ष्य त्यांनी ठेवले असल्याचे सांगितले.

गडकरी म्हणाले, ‘नरिमन पॉइंट, मुंबई येथून नागरिकांना १२ तासांत दिल्लीला नेण्याचे माझे स्वप्न आहे; दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाचे सुमारे ७० टक्के काम आधीच पूर्ण झाले आहे, तो आता नरिमन पॉइंटला जोडण्याचे काम करत आहोत.’ पेट्रोल आणि डिझेलच्या वापराच्या जागी पर्यायी इंधन वापरण्याच्या उद्दिष्टाचाही गडकरी यांनी पुनरुच्चार केला.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Centre to raise money through capital markets for road projects says nitin gadkari zws
First published on: 24-08-2022 at 06:52 IST