नवी मुंबई : सिडको महामंडळाच्या व्यवसाय सुलभता कक्षाचे उदघाटन उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्या हस्ते सीबीडी येथील सिडकोच्या मुख्यालयात गुरुवारी करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
या प्रसंगी सिडकोचे सह-व्यवस्थापकीय संचालक अश्विन मुद्गल, डॉ. कैलास शिंदे, मुख्य दक्षता अधिकारी शशिकांत महावरकर, एमसीएचआय अध्यक्ष मधु पाटील उपस्थित होते.
व्यवसाय सुलभता पोर्टलमुळे सिडकोच्या सेवांचे सुलभीकरण, सुसूत्रीकरण होऊन सर्वसामान्य नागरिक, गुंतवणूकदार, बांधकाम व्यावसायिक, विकासक अशा विविध घटकांना अधिक जलद, पारदर्शक व कार्यक्षम सेवा मिळणार आहे. तसेच यामुळे नवी मुंबईच्या ‘आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर’ या लौकिकात भर पडणार आहे, असे डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले.
सिडकोने ई-प्रशासनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मालमत्ता हस्तांतरण, बांधकाम परवाना, वसाहत सेवा आदी सेवा यापूर्वीच ऑनलाइन माध्यमाद्वारे उपलब्ध करून दिल्या आहेत.
यामुळे नवी मुंबईतील नागरिकांना केवळ एका ‘क्लिक’द्वारे सिडकोशी संबंधित सेवांचा लाभ घेणे शक्य झाले आहे. परंतु या सर्व सेवा एकाच ठिकाणी ‘एक खिडकी निवारण ’ (सिंगल विंडो क्लिअरन्स) पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी सिडकोतर्फे व्यवसाय सुलभता पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे.
या एकाच पोर्टलवर अर्ज सादरीकरण, अर्जाचे मूल्यमापन आणि अर्जाचा निपटारा होणार आहे. या सेवा अधिक पारदर्शक व प्रतिसादात्मक पद्धतीने पुरविणे, नागरिक आणि शासन यांच्यातील सुसंवाद वाढवणे आदी सिडकोच्या व्यवसाय सुलभतेची उद्दिष्टे आहेत.
सध्या व्यवसाय सुलभता पोर्टल अंतर्गत वसाहत सेवा (६४ दुय्यम सेवा), बांधकाम परवाना सेवा (४ दुय्यम सेवा), अभियांत्रिकी सेवा (३ दुय्यम सेवा), सर्वसाधारण सेवा (४ दुय्यम सेवा) आणि नैना प्रकल्पा संदर्भातील सेवा (४ दुय्यम सेवा) उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच या पोर्टल नागरिकांना त्यांनी केलेल्या अर्जाची स्थिती आणि संबंधित विभागाकडून सेवा मिळण्यासाठी लागणारा कालावधीही जाणून घेता येणार आहे.
विविध भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या क्यूआर कोडद्वारे व्यवसाय वापरकर्त्यांना आवश्यक ती कागदपत्रे आणि निपटाऱ्यासाठी लागणारा आवश्यक वेळ यांबाबतची अद्ययावत माहितीही पोर्टलद्वारे मिळणार आहे.
विभागीय कार्यालयांतही सुविधा
नागरिकांना http://www.cidcoindia.com/eodb पोर्टलची माहिती करून देण्याच्या उद्देशाने सिडको भवनमध्ये नागरिक सुविधा केंद्रही (सीएफसी) स्थापन करण्यात आले आहे. अशाच प्रकारची सुविधा सिडकोच्या सर्व विभागीय कार्यालयांतही उपलब्ध करून देणे नियोजित आहे.