देशातील दुष्काळ निवारणाहेतू उद्योगांची आघाडीची संघटना असलेल्या ‘सीआयआय’ने (भारतीय औद्योगिक महासंघ) पुढाकार घेतला असून देशातील ५० जिल्ह्य़ांमध्ये जलसंचय कार्य केले जाणार आहे. उद्योग संघटना सध्या कार्य करत असलेल्या सध्याच्या औरंगाबाद व्यतिरिक्त यामध्ये महाराष्ट्रातील १० जिल्ह्य़ांचा समावेश करणार आहे.
संघटनेचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. नौशाद फोर्ब्स यांनी मुंबईतील पहिल्या पत्रकार परिषदेत आगामी कार्याबाबत सांगताना ‘जल व्यवस्थापना’वर भर दिला. संघटनेच्या महाराष्ट्र परिषदेचे अध्यक्ष सुनील खन्ना यांनी सांगितले की, दुष्काळ, कौशल्य विकास, वस्त्रोद्योग आदी क्षेत्राबाबत महाराष्ट्रात खासगी-सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर कार्य करण्याची तयारी संघटनेने राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे दाखविली आहे. संघटनेच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष सुधीर मेहता व महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी हेही यावेळी उपस्थित होते. केंद्र सरकारतर्फे राबविले जाणाऱ्या आर्थिक सुधारणांवर संघटनेची नजर असून चालू आर्थिक वर्षांत ८ टक्के विकास दर शक्य आहे, असा विश्वास डॉ. फोर्ब्स यांनी व्यक्त केला.