खातं बंद करतानाही बँक कशासाठी आणि किती रक्कम घेते?; जाणून घ्या

जाणून घ्या कशासाठी बँक किती रक्कम आकारते

बँक

अनेकदा बँका वेगवेगळ्या कारणांसाठी खातेदारांकडून अतिरिक्त पैसे आकारतात. विशेष करुन किमान रक्कम बँक खात्यावर न ठेवणाऱ्या खातेदारांना दंड म्हणून बँका बरीच रक्कम आकारतात. मागील तीन वर्षांमध्ये देशभरातील बँकांनी किमान रक्कम न ठेवणाऱ्या बचत खातेदारांकडून दंड म्हणून ९ हजार ७२१ कोटींची रक्कम गोळा केली आहे. सरकारी आणि खासगी बँकांनी आकारलेल्या या दंडासंदर्भात अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचे राज्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे. विशेष म्हणजे हा आकडा देशातील १८ सार्वजनिक आणि ४ खासगी श्रेत्रातील बँकांचा आहे. त्यामुळे एकंदरित सर्व बँकांचा विचार केल्यास ही रक्कम अधिक वाढेल.

विशेष म्हणजे एखाद्या खातेदाराला त्याचे बँक खाते बंद करायचे असल्यास ही दंडाची रक्कम भरल्याशिवाय बँक खाते बंद करु देत नाही. या दंडाची सर्व रक्कम भरल्यानंतरच बँक खातेदाराला खाते बंद करण्याची परवानगी देते. त्यामुळेच खातेदारांनी बँक खात्यामधील किमान रक्कम ठेवावी असा सल्ला अर्थतज्ज्ञ देतात. किमान रक्कम खात्यावर ठेवल्यास ते आपल्या इच्छेप्रमाणे अतिरिक्त पैसे न भरता हवे तेव्हा बंद करता येते. मात्र तुम्ही खात्यावर किमान रक्कम ठेवत नसाल तर आधी दंडाची रक्कम भरल्यानंतरच खाते बंद करण्यासाठी बँक परवानगी देते.

तसेच एखाद्याने बँकेमध्ये खातं सुरु केलं आणि ते एका वर्षाच्या आत बंद करायचं असल्याच बँक त्या खातेदाराकडून क्लोजर चार्ज म्हणजेच खाते बंद करण्यासाठीची रक्कम घेते. मात्र तुम्ही बँकमध्ये खातं सुरु केल्यानंतर ते १४ दिवसांच्या आत बंद केल्यास बँकेकडून क्लोजर चार्चेस आकारले जात नाहीत. एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर बँकमधील खातं बंद केल्यास खातेदारांकडून कोणतेही रक्कम घेतली जात नाही.

किमान रक्कम खात्यावर न ठेवल्यास बँक अतिरिक्त रक्कम आकारते. मात्र त्याचबरोबर इतर अनेक कारणांसाठी बँका खातेदारांकडून रक्कम आकारतात. यामध्ये कॅश रोकड व्यवहार (cash transactions), डिजिटल व्यवहार (digital transactions), मोफत मर्यादेपेक्षा अधिक वेळा एटीएममधून पैसे काढणे (withdrawal from ATM beyond free limit charges), एसएमएस अलर्ट शुल्क (SMS alert charges) बँक ग्राहकांकडून आकरते. ही रक्कम बँका त्यांचे दैनंदिन व्यवहार चालवण्यासाठी वापरतात. मात्र अनेकदा खासगी बँका ग्राहकांकडून मोठ्याप्रमाणात अतिरिक्त रक्कम आकारतात. ग्राहक म्हणून खातेदारांना बँक कोणत्या कोणत्या कारणांसाठी आपल्याकडून रक्कम आकारते हे ठाऊक असणे गरजेचे असते. जर आपली बँक अतिरिक्त पैसे आकारत असेल तर ग्राहक झिरो बॅलेन्स खात्याचा पर्याय निवडू शकतात किंवा दुसऱ्या बँकेत खातं उघडू शकतात. कमीत कमी बँक शुल्कासाठी दोन वेगवेगळ्या बँकामध्ये किती शुल्क आकारले जाते याची तुलना करुन कमी दर आकारणाऱ्या बँकेची निवड करण्याचा पर्यायाचाही विचार अशावेळेस करता येईल.

किमान रक्कम खात्यावर न ठेवल्यास बँका प्रती महिना २०० ते ८०० रुपये आकारतात. सार्वजनिक श्रेत्रातील बँका याहून कमी दर आकारतात. रोकड व्यवहारासाठी बँका प्रती व्यवहार ५ ते १५० रुपयाच्या दरम्यान शुल्क आकारतात. ही रक्कम किती मोठा व्यवहार केला आहे यावर अवलंबून असते. ठराविक मर्यादेहून अधिक वेळा एटीएममधून पैसे काढल्यास प्रती व्यवहार म्हणजेच पर ट्रान्झॅक्शन २० ते ४० रुपये आकारले जातात. सरकारी बँकांसाठी हा दर ५ ते १० रुपये प्रती व्यवहार इतका आहे. अनेक बँका एनईएफटी आणि आरटीजीएसच्या ऑनलाइन व्यवहारांसाठी शुल्क घेत नाहीत. मात्र काही बँका यासाठीही प्रती ट्रान्झॅक्शन ५० रुपये आकारतात.

खाते बंद करण्यासाठी क्लोजर फी म्हणून किती कर आकारावा याबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे कोणतेही स्पष्ट नियम नाहीत. त्यामुळे बँका स्वत:च्या नियमांनुसार हे शुल्क आकारतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Closing your bank account bank charges scsg