पीटीआय, नवी दिल्ली : वीज व खते आणि वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सीएनजीमध्ये रूपांतरित होणाऱ्या नैसर्गिक वायूच्या किमती शुक्रवारी ४० टक्क्यांनी वाढून विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. जागतिक पातळीवर वायूच्या किमतीत वाढ झाल्याने नैसर्गिक वायूचे दर ८.५७ अमेरिकी डॉलर प्रति दशलक्ष ब्रिटिश थर्मल युनिटवर पोहोचले आहे.

तेल मंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार, स्थानिक पातळीवर उत्पादित होणाऱ्या नैसर्गिक वायूचे दर सध्याच्या प्रति युनिट (एमएमबीटीयू) ६.१ डॉलरवरून ८.५७ डॉलरवर नेण्याचा निर्णय घेण्यात आला. याचबरोबर, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि तिची भागीदार बीपी पीएलसीने केजी खोऱ्यामधील डी ६ खंडातील आणि नवीन क्षेत्रातील वायू उत्पादनांच्या किमती प्रति युनिट (एमएमबीटीयू) ९.९२ डॉलरवरून १२.६ डॉलपर्यंत वाढवल्या आहेत, असे आदेशात म्हटले आहे. हे मुंबई किनारपट्टीवरील ओएनजीसीच्या क्षेत्रातील आणि मुक्त व्यापार क्षेत्रातील आतापर्यंतचे सर्वोच्च दर आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर वायूंच्या किमतीत वाढ झाल्याने ही दरवाढ करण्यात आली असून एप्रिल २०१९ पासून दरांमध्ये झालेली ही तिसरी वाढ आहे.

किती झळ बसणार?

नैसर्गिक वायू हा खत तयार करण्यासाठी तसेच वीजनिर्मितीसाठी आवश्यक आहे. तसेच त्याचे सीएनजीमध्ये आणि स्वयंपाक करण्याच्या उद्देशाने वापरल्या जाणाऱ्या पीएनजी (घरोघरी पाइपद्वारे पुरवठा होणाऱ्या) इंधनामध्ये रूपांतरण केले जाते. नैसर्गिक वायूच्या किमतींमध्ये झालेली प्रचंड वाढ सीएनजी आणि पीएनजीच्या उच्च दरांमध्ये परावर्तित होण्याची शक्यता आहे. हा सर्वसामान्य ग्राहकांना थेट दणका ठरेल. कारण गेल्या एका वर्षांतच त्यात ७० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ताज्या दरवाढीने दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये सीएनजी आणि पीएनजीचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे वीजनिर्मितीच्या खर्चातही वाढ होईल. मात्र वायूपासून निर्माण होणाऱ्या विजेचा वाटा फारच कमी असल्याने ग्राहकांना त्याची मोठी झळ बसणार नाही. त्याचप्रमाणे खतनिर्मितीचा खर्चही वाढेल. पण सरकार खतावर अनुदान देत असल्याने शेतकऱ्यांना झळ बसण्याची शक्यता कमी आहे.