LPG Cylinder Price: नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका बसला आहे. १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजीच्या दरात प्रति सिलेंडर २५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आजपासून त्याची किंमत २२५३ रुपये असेल. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही ही दिलासादायक बाब आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्याने रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थ खाणे आणखी महाग होणार आहे. याशिवाय इतर गोष्टींच्या उत्पादनावरही त्याचा परिणाम होईल.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की फक्त १० दिवसांपूर्वी घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर वाढवण्यात आले होते, तर २२ मार्चलाच व्यावसायिक सिलेंडर स्वस्त झाले होते. आज म्हणजेच नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशीही, घरगुती एलपीजी सिलिंडर दिल्लीत ९४९.५० रुपये, कोलकात्यात ९७६ रुपये, मुंबईत ९४९.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ९६५.५० रुपये आहे. एलपीजी सिलेंडरची किंमत तपासण्यासाठी तेल कंपन्या दर महिन्याला सरकारी तेल कंपनी IOC च्या वेबसाइटवर नवीन दर जारी करतात. तुम्ही https://iocl.com/pages/indane-cooking-gas-overview वर भेट देऊन तुमच्या शहरातील एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत तपासू शकता.

महागाईचा आणखी एक धक्का

आजपासून महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या वाढत्या किमतींमुळे त्रस्त असलेल्या लोकांना आजपासून मोबाईल, टीव्ही, एसी आणि फ्रीज खरेदी करण्यासाठी जास्त किंमत मोजावी लागणार आहे. सरकारने १ एप्रिलपासून अॅल्युमिनियम धातूवर ३० टक्के आयात शुल्क लावले आहे, त्यामुळे टीव्ही, एसी आणि फ्रीज महाग होणार आहेत.