विक्रीत दमदार ६०.६ टक्के वाढ

मुंबई : करोना प्रकरणांमध्ये झालेली घट आणि टाळेबंदीनंतर कमी करण्यात आलेले निर्बंध याचाच सुपरिणाम म्हणून सूचीबद्ध गैर-वित्तीय, गैर-सरकारी कंपन्यांचे व्यवसाय पूर्वपदावर येत आहेत. कंपन्यांच्या विक्री आणि निव्वळ नफ्यात ३० जून २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीत लक्षणीय वाढ नोंदवली गेली.

रिझव्‍‌र्ह बँकेने केलेल्या विश्लेषणानुसार, जून २०२१ मध्ये २,६१० कंपन्यांची एकत्रित विक्री ६०.६ टक्क्यांनी वाढून ९.८७ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे, जी गेल्या वर्षी ६.११ लाख कोटी रुपये होती. गेल्या वर्षी जून तिमाहीत करोना महामारीमुळे कंपन्यांचे कामकाज जवळपास थंडावले होते. परिणामी उत्पादन आणि विक्रीवर प्रतिकूल परिणाम झाला होता.

चालू वर्षांत जून महिन्यात २,६१० कंपन्यांच्या निव्वळ नफ्याचे एकत्रित प्रमाण ९०,३२५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत या कंपन्यांना एकत्रित रूपात २,६४६ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. या दरम्यान कंपन्यांचा व्याजापोटी खर्च ८.६ टक्क्यांनी कमी होऊन ३५,७४४ कोटी रुपयांवर आला आहे. जो गेल्या वर्षी ३८,५२७ कोटी रुपये होता. मात्र जून २०२१ मध्ये कर्मचाऱ्यांवरील वेतनादी खर्च १.०१ लाख कोटी रुपयांवरून वाढून १.१७ लाख कोटी रुपये झाला. त्यात १५.६ टक्क्यांची वाढ झाली आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या अभ्यासानुसार, कंपन्यांचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यामुळे कच्च्या मालावरील खर्च १०९.१ टक्क्यांनी वाढून यावर्षी जूनमध्ये ४.०४ लाख कोटी रुपयांवर गेला आहे. जो गेल्या वर्षी १.८९ लाख कोटी होता. दरम्यान उत्पादन क्षेत्रातील १,६७४ कंपन्यांची २०२१-२२ च्या पहिल्या तिमाहीमध्ये विक्रीत ७५ टक्क्यांची मोठी वाढ नोंदवली आहे. त्या तुलनेत २०२०-२१च्या पहिल्या तिमाहीत या कंपन्यांच्या विक्रीमध्ये ४१.१ टक्क्यांची घसरण झाली होती.

उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांच्या विक्रीत वाढ झाल्यामुळे २०२१-२२ च्या पहिल्या तिमाहीत त्यांनी कच्च्या मालावर केलेला खर्चही वाढला आहे. विक्रीत झालेल्या वाढीच्या अनुषंगाने जून तिमाहीत उत्पादन आणि माहिती तंत्रज्ञान सेवा क्षेत्रातील कंपन्यांच्या कार्यकारी नफ्यांमध्ये मोठी वाढ नोंदवली आहे. उत्पादन कंपन्यांचे व्याज व्याप्ती प्रमाण (इंटरेस्ट कव्हरेज रेशो) पहिल्या तिमाहीत ७.५ वर स्थिर राहिले. जे याआधी ७.३ होते. सरलेल्या तिमाहीत उत्पादन आणि कंपन्यांसाठी कार्यकारी नफ्याचे प्रमाण अंतर स्थिर राहिले. मात्र माहिती तंत्रज्ञान कंपन्या वगळता इतर कंपन्यांच्या कार्यकारी नफ्यात घसरण झाली.

अपवाद दूरसंचार कंपन्यांचा

करोनाकाळात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या वगळता सर्व क्षेत्रांतील कंपन्यांना मोठा फटका बसला. या दरम्यान माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची विक्रीतील वाढ संपूर्ण साथीच्या काळात सकारात्मक स्थितीत राहिली आहे. ती २०२१-२२ च्या पहिल्या तिमाहीत ६.४ टक्क्यांवरून वाढत १७.५ टक्क्यांवर पोहोचली. सरलेल्या जून तिमाहीत वार्षिक आधारावर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या व्यतिरिक्त इतर कंपन्यांची विक्रीही वाढली. याला अपवाद हा महसुलात घट झालेल्या दूरसंचार कंपन्यांचा असल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेने म्हटले आहे.