मुंबई : अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरासंबंधी महत्त्वपूर्ण बैठकीपूर्वी गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्याने भांडवली बाजारात बुधवारी घसरण झाली. मध्यवर्ती बँकेने करोना काळात केलेल्या प्रोत्साहनपर उत्तेजन उपाययोजनांमध्ये कपात होणे अपेक्षित आहे.

सलग दुसऱ्या दिवशी बाजारात घसरण होत दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक – सेन्सेक्स  २५७.१४ अंशांच्या घसरणीसह ५९,७७१.९२ पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक – निफ्टीमध्ये ५९.७५ अंशांची घसरण झाली. तो १७,८२९.२० पातळीवर स्थिरावला. अशा तºहेने भांडवली बाजारात संवत्सर २०७७ ची घसरणीने सांगता झाली.

बाजारात घसरण असतानाही, लार्सन अँड टुब्रो, अल्ट्राटेक सिमेंट, एशियन पेंट्स, स्टेट बँक, टाटा स्टील आणि बजाज फायनान्सचे समभाग प्रत्येकी ३.९९ टक्क्यांपर्यंत तेजीत व्यवहार करत होते.

सकाळच्या सत्रात भांडवली बाजाराची सकारात्मक सुरुवात झाली. मात्र फेडरल रिझर्व्हच्या (फेड) आगामी बैठकीच्या पाश्र्वाभूमीवर प्रमुख देशांच्या निर्देशांकात घसरण झाल्याने त्याचे पडसाद भारतीय भांडवली बाजारावर उमटल्याने दुपारच्या सत्रात घसरण झाली. फेड नजीकच्या कालावधीत रोखे खरेदी कार्यक्रम गुंडाळण्यासह व्याजदर वाढीबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. व्याजदर वाढीबाबत कोणतेही संकेत भांडवली बाजारावर नकारात्मक परिणाम करणारा ठरेल, असे मत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदविले.

सवंत्सरात ‘सेन्सेक्स’ची ३७ टक्के झेप

विक्रम संवत्सर २०७७ मध्ये म्हणजेच मागील दिवाळीपासून सेन्सेक्समध्ये १६,१३३.९४ अंशांची म्हणजेच ३६.९७ टक्क्यांची वाढ झाली. तर निफ्टीमध्ये ५,०४८.९५ अंशांची भर पडली. हा निर्देशांक ३९.५० टक्क्यांनी वधारला आहे.

आज मुहूर्ताचे व्यवहार

लक्ष्मीपूजनानिमित्त गुरुवारी संध्याकाळी मुहूर्ताचे विशेष व्यवहार पार पडणार आहे. संध्याकाळी ६.१५ ते ७.१५ दरम्यान असे तासाभरासाठी ते सुरू राहतील. भांडवली बाजारात दरवर्षी लक्ष्मीपूजनानिमित्त एक तासाचे विशेष सत्र आयोजित करण्यात येते. परंपरेने या सत्रात बाजार वधारण्याची गुंतवणूकदारांना अपेक्षा असते.