नवी दिल्ली, :ऐंशीच्या दशकातील चारचाकींमधील लोकप्रिय नाममुद्रा अ‍ॅम्बेसेडर आता नव्या जमान्याला साजेसे इलेक्ट्रिक रूप धारण करणार असल्याच्या वृत्तानंतर, हिंदूस्तान मोटर्स लिमिटेडने तिची आणखी एक लोकप्रिय नाममुद्रा ‘कॉन्टेसा’बाबत महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा मंगळवारी केली. सीके बिर्ला समूहातील या कंपनीने ‘हिंदूस्तान कॉन्टेसा’ ही नाममुद्रा एसजी कॉर्पोरेट मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेडला विकण्याची घोषणा केली आहे.

हिंदूस्तान मोटर्सने चालू महिन्यात १६ जूनला एसजी कॉर्पोरेट मोबिलिटीसोबत नाममुद्रा हस्तांतरण करार केला असून हा व्यवहार किती मोबदल्यात पार पडला याबाबत कंपनीकडून काहीही माहिती देण्यात आली नाही. कॉन्टेसा हे हिंदूस्तान मोटर्सचे १९८० ते २००० दरम्यान विकले गेलेले सेडान श्रेणीतील आघाडीचे वाहन होते. देशात ९० च्या दशकात लोकप्रिय असलेल्या अ‍ॅम्बेसेडरच्या वरच्या श्रेणीतील वाहन म्हणून ‘कॉन्टेसा’ची ओळख होती. मात्र वाहन निर्मिती क्षेत्रामध्ये पुढे मारुती सुझुकी, ह्युंदाई, फोर्डसारख्या कंपन्यांचे आगमन झाल्यामुळे कॉन्टेसासमोर मोठे आव्हान उभे केले.

जागतिक पातळीवरील वाहन कंपन्यांसोबत निर्माण झालेल्या स्पर्धेमुळे हिंदूस्तान मोटर्सला मोठा फटका बसला होता, यामुळे २०१४ मध्ये पश्चिम बंगालमधील उत्तरपारा येथे उत्पादन प्रकल्प बंद करून अ‍ॅम्बेसेडरचे उत्पादन थांबविले होते. त्यांनतर २०१७ मध्ये अ‍ॅम्बेसेडर नाममुद्रा फ्रेंच कंपनी सध्याच्या स्टेलांटिसचा भाग असलेल्या पीएसए समूहाने फेब्रुवारी २०१७ मध्ये ८० कोटी रुपयांना खरेदी केली होती.