सातत्य, काळानुरूप फेरबदल हाच गुंतवणुकीचा यशमंत्र !

बदलत्या काळानुसार गुंतवणुकीचे पुनरावलोकन करून आवश्यक ते फेरबदल विनाविलंब आणि भावनेचा पैलू बाजूला ठेवून केले गेले पाहिजेत.

सातत्य, काळानुरूप फेरबदल हाच गुंतवणुकीचा यशमंत्र !
श्रोतृवर्गात पहिल्या रांगेत, पालिकेचे उपायुक्त अजित मुठे, उपायुक्त (मुख्यालय) मारुती गायकवाड, प्रभारी मुख्य लेखाधिकारी अजित कुलकर्णी.

मुंबई : बदलत्या काळानुसार गुंतवणुकीचे पुनरावलोकन करून आवश्यक ते फेरबदल विनाविलंब आणि भावनेचा पैलू बाजूला ठेवून केले गेले पाहिजेत. गुंतवणुकीत योग्य वेळी बाहेर पडण्याचे तंत्र जितक्या लवकर आपल्याला समजेल, तर कोणत्या वेळी, कोणत्या गुंतवणुकीत प्रवेश केव्हा करावा याचा निर्णय घेणेही मग शक्य होईल, असा  कानमंत्र गुरुवारी आयोजित ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ सत्रात अर्थअभ्यासक कौस्तुभ जोशी यांनी दिला.

मीरा-भाईंदर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी गुरुवारी सायंकाळी या विशेष ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ गुंतवणूकदार जागराचे आयोजन करण्यात आले होते. आघाडीचे फंड घराणे – आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड प्रस्तुत हा कार्यक्रम भाईंदरमधील महापालिका नगर भवन हॉल येथे पार पडला. पालिकेचा कर्मचारी व अधिकारी वर्गाने या कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने व आवर्जून उपस्थित होता.

भांडवली बाजारात वादळी चढ-उतार, महागाईचा चढता पारा आणि परिणामी व्याजाचे वाढत चाललेले दर, अशा अस्वस्थ व अस्थिर वातावरणात सुयोग्य आर्थिक नियोजनाचे मार्ग या निमित्ताने वक्त्यांकडून सांगण्यात आला. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून आलेल्या प्रश्नांचे निरसनही वक्त्यांनी केले. वक्ते आणि श्रोते यांच्यातील दुवा म्हणून सुनील वालावलकर यांनी समन्वयकाची भूमिका बजावली.

गुंतवणूक करताना ‘अ‍ॅसेट अलोकेशनह्ण म्हणजेच मालमत्ता विभाजन हा सर्वात महत्त्वाचा पैलू असून, उत्तरोत्तर चढत जाणाऱ्या महागाईच्या पर्वात हे मालमत्ता विभाजनाचे तंत्रच खूप मोलाची साथ देणारे ठरेल, असे कौस्तुभ जोशी यांनी सांगितले. अर्थात सर्व पैसा एकाच गुंतवणूक साधनांमध्ये गुंतविण्याची बऱ्याचदा केली जाणारी चूक टाळावी. महागाईवर मात करणाऱ्या परताव्यासाठी शेअर बाजारात गुंतवणूक करणे आवश्यक आहेच. मात्र भरपूर परतावा मिळेल म्हणून थेट समभाग की म्युच्युअल फंडात सगळी गुंतवणूक न करता बँक मुदत ठेवी, सोने, सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी, एनपीएस यासारख्या पर्यायांचा देखील गुंतवणुकीत समावेश करायला हवा, असे त्यांनी सुचविले.

या कार्यक्रमात मीरा-भाईंदरच्या आमदार गीता जैन, महापौर ज्योत्स्ना हसनाळे, मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, उपायुक्त (मुख्यालय ) मारुती गायकवाड, उपायुक्त अजित मुठे, उपायुक्त संजय शिंदे, प्रभारी मुख्य लेखाधिकारी अजित कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती होती.

आर्थिक स्वातंत्र्याचा संकल्प !

देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत. मात्र आपण खऱ्या अर्थाने आर्थिक स्वातंत्र्य आणि स्वावलंबन अनुभवतो आहोत काय? प्रत्येकजण भविष्यात गुंतवणूक करू म्हणून टाळाटाळ करतो व प्रत्यक्षात गुंतवणुकीला सुरुवातच होत नाही. यामुळे उत्तम गुंतवणूक करण्यासासाठी इच्छाशक्ती आणि बरोबरीनेच गुंतवणूक कशासाठी हे सांगणारे ठोस आर्थिक उद्दिष्ट आवश्यक आहे. त्यानुसार मग गुंतवणुकीची पर्यायी निवड शक्य बनेल. गुंतवणुकीतील सातत्य, नियमित आढावा घेऊन फेरबदल या घटकांवर लक्ष देऊन केलेली गुंतवणूक ही सदासर्वदा आणि कोणत्याही बाजार परिस्थितीत निश्चितच लाभदायक ठरते. गुंतवणुकीची रक्कम भलेही कितीही कमी असली तरी लवकरात लवकर गुंतवणुकीचा श्रीगणेशा केल्यास जीवनातील आर्थिक उद्दिष्टे सहज साध्य करता येतात.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
रिझव्‍‌र्ह बँक निग्रहाचे बाजाराकडून स्वागत
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी