अंबानी श्रीमंतांच्या यादीत अव्वलस्थानी; गौतम अदानी यांच्या संपत्तीत तिपटीने तर, राधाकृष्ण दमानी यांच्या दुपटीने भर


मुंबई : देशातील श्रीमंतांच्या ‘फोर्ब्स’ नियतकालिकाकडून जाहीर क्रमवारीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी यांनी अव्वल स्थान कायम ठेवले आहे. ४ अब्ज डॉलर वाढीसह अंबानी यांची एकूण संपत्ती ९२.७ अब्ज डॉलरवर गेली असून, ते सलग १४ व्या वर्षी श्रीमंत भारतीयांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. 

गुरुवारी जाहीर झालेल्या ‘फोर्ब्स’च्या यादीनुसार, देशातील पहिल्या १०० श्रीमंत भारतीयांची एकत्रित संपत्ती ७७५ अब्ज डॉलरच्या घरात जाणारी आहे. सरलेल्या वर्षात (२०२०) त्यांच्या संपत्तीत ५० टक्क्यांची म्हणजे २५७ अब्ज डॉलरची भर पडली. देशात एकीकडे करोनाची साथ पसरल्याने सुरू झालेल्या टाळेबंदीमुळे हजारो लोकांचे रोजगार बुडाले, तर बहुतांशांचे उत्पन्न घटले, मात्र याच काळात देशातील श्रीमंतांनी भरभराट अनुभवली.

अंबानींपाठोपाठ दुसऱ्या स्थानावर ७४.८ अब्ज डॉलर संपत्तीसह अदानी समूहाचे गौतम अदानी आहेत. गेल्यावर्षी त्यांच्या संपत्तीत तिप्पट वाढ झाली आहे. अदानींच्या संपत्तीत २०२१ मध्ये ४९.५ अब्ज डॉलरची भर पडली. जानेवारीपासून सुमारे २१ टक्के वाढ राखणाऱ्या भांडवली बाजारात समूहाच्या वधारत्या समभाग मूल्यानेही अदानींच्या वाढत्या संपत्तीत सिंहाचा वाटा राखल्याचे ‘फोर्ब्स’ने नमूद केले आहे. २०२० मध्ये अंबानी आणि अदानी यांच्या संपत्तीत ६३.५ अब्ज डॉलरचे अंतर होते ते आता कमी होऊन १७.९ अब्ज डॉलर इतके राहिले आहे.

तिसरे स्थान ‘एचसीएल टेक्नॉलॉजीज’चे अध्यक्ष शिव नाडर यांनी ३१ अब्ज डॉलर संपत्तीसह पटकावले आहे. ‘डी-मार्ट’ किराणा दालने चालवणाऱ्या ‘अ‍ॅव्हेन्यू सुपरमार्ट’चे संस्थापक राधाकृष्ण दमानी यांनी श्रीमंतांच्या यादीत चौथे स्थान मिळविले.