देशात करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने जनजीवन पूर्वपदावर येत असताना महागाईच्या भडक्याचे मोठे आव्हान अर्थव्यवस्थेपुढे उभे ठाकेल, अशी चिन्हे आहेत. ऑगस्ट महिन्यात घाऊक किंमत निर्देशांक ११.३९ टक्क्यांवर पोहोचला असून, सलग पाचव्या महिन्यात त्याने दोन अंकी चढता क्रम कायम राखला आहे.

सोमवारी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट महिन्यात किरकोळ महागाई दराने किंचित दिलासा दिला असला तरी घाऊक किंमत निर्देशांकात वाढ सुरूच असल्याचे मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीने स्पष्ट केले. अन्नधान्याच्या किमती कमी झाल्या असल्या तरीही मुख्यत: उत्पादित वस्तूंच्या किमती वाढल्याने घाऊक किंमत निर्देशांकात वाढ झाली आहे.

जुलैमध्ये घाऊक महागाई दर ११.१६ टक्के होता. तर गेल्या वर्षी अर्थात ऑगस्ट २०२० मध्ये त्याचे प्रमाण ०.४१ टक्के होते.