खासगी क्षेत्राचा सक्रिय पुढाकार आणि सार्वजनिक क्षेत्राच्या सुविधाकर्ते म्हणून भूमिका पाहता, शिक्षण तंत्रज्ञानामध्ये जगाची राजधानी बनून मध्यवर्ती स्थान भारताला मिळविता येऊ शकते, असा विश्वास निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला.

शिक्षणविषयक परिणामांमध्ये भारताला लक्षणीय सुधार करण्याची गरज आहे आणि तंत्रज्ञानाचा अवलंब केला गेल्यास देशाला शिक्षण तंत्रज्ञान (एडटेक) आघाडीवर मोठी झेप घेता येऊ शकते आणि याचे आताच सुस्पष्ट संकेतही मिळत आहेत, असे कांत यांनी ‘पब्लिक अफेयर्स फोरम ऑफ इंडिया’च्या आभासी परिसंवादात बोलताना सांगितले. किफायतशीर आणि सर्वदूर इंटरनेट जोडणी उपलब्ध आहेच, त्याला तंत्रज्ञानाधारित पायाभूत सोयीसुविधांची जोड दिली गेल्यास शिक्षणाच्या क्षेत्रात देशाला कामगिरी लक्षणीय उंचावता येणे शक्य आहे. सध्या उपलब्ध भौतिक सुविधांवर केवळ विसंबून राहून चालणार नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

याच परिसंवादात बायजूचे संस्थापक व मुख्याधिकारी बायजू रवींद्रन म्हणाले, शिक्षण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकण्याच्या सर्वोत्तम पद्धतींचा लाभ मिळेलच, परंतु भारत हा जागतिक प्रतिभेच्या निष्णात शिक्षकांचा संचय असणारे प्रमुख केंद्रही बनू शकेल.

‘सार्वत्रिकीकरणही व्हावे’

भारतात शिक्षण तंत्रज्ञान (एडटेक) क्षेत्रासाठी अनुकूल परिसंस्था पाहता, त्यात वाढीच्या दृष्टीने मोठ्या शक्यता दिसून येतात, याचा पुनरुच्चार अमिताभ कांत यांनी केला. यातून गुणवान विद्यार्थी घडविले जातील, शिक्षणविषयक चांगले परिणामही दिसून येतील, देशाच्या प्रगतीला हातभारही लागेल, पण समाजातील वंचित घटकांतील मुलामुलींना शिक्षणाची दारे खुली होतील, यावर कटाक्षाने लक्ष दिले जायला हवे. कांत यांच्या मते, शिक्षणव्यवस्थेत तंत्रज्ञानाच्या एकात्म अंतर्भावाने भारतात सध्या दिसणारी डिजिटल दरी भरून काढली जाऊन, ग्रामीण भागात शिक्षणाची ज्ञानगंगा वाहताना दिसू शकेल.