नीरव मोदीच्या परदेशातील मालमत्तांची चौकशी करण्यास न्यायालयाची परवानगी

पीएनबी घोटाळ्यात तपास यंत्रणेचे एक पाऊल पुढे

पीएनबी घोटाळ्यात तपास यंत्रणेचे एक पाऊल पुढे

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील प्रमुख सूत्रधार हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या परदेशात असलेले व्यवसाय तसेच मालमत्तांची चौकशी करण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया (लेटर्स रोगेटोरी) सुरू करण्यास काळा पैसा प्रतिबंधक कारवाईअंतर्गत स्थापित विशेष न्यायालयाने परवानगी दिली आहे.

या प्रकरणी चौकशी करीत असलेल्या सक्तवसुली संचालनालयाने अशी परवानगी मिळावी यासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये अशी पत्रे जारी करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी त्यात विनंती करण्यात आली होती. विशेष न्यायालयाचे न्या. एम. एस. आझमी यांनी हा अर्ज मंजूर करताना ही प्रक्रिया सुरू करण्याची परवानगी संचालनालयाला दिली.

नीरव मोदी याचे हॉँगकॉँग, अमेरिका, ब्रिटन, अरब अमीराती, दक्षिण आफ्रिका, सिंगापूर येथे व्यवसाय आहेत तसेच या देशांमध्ये त्याच्या मालमत्ताही आहेत. याबाबतची माहिती तसेच आवश्यक ती कागदपत्रे तपासणीसाठी ताब्यात घेण्यासाठी आवश्यक असणारी प्रक्रिया सुरु करणे त्यामुळे संचालनालयाला शक्य होणार आहे. परदेशातील न्यायालयाकडून सहाय्य मिळावे, यासाठी जी प्रक्रिया केली जाते त्याला लेटर्स रोगेटोरी असे संबोधले जाते.

नीरव मोदी याच्या मालकीच्या डायमंड आर यूएस, सोलार एक्स्पोर्ट, स्टेलार डायमंडस्, फायरस्टार डायमंड या कंपन्या आहेत. कच्चा व पैलू पाडलेल्या हिऱ्यांचा तसेच त्यापासून तयार केलेल्या दागिन्यांचा व्यवहार या कंपन्यांकडून केला जातो. या कंपन्यांचा व्यवसाय हॉँगकॉँग, अमेरिका, ब्रिटन, अरब अमीराती, दक्षिण आफ्रिका, सिंगापूर येथे पसरला आहे. पंजाब नॅशनल बँकेकडून नीरव मोदी कंपनीला मोठय़ा रकमेची हमी पतपत्रे (लेटर ऑफ अंडरटेकिंग) जारी करण्यत आली आहेत. ही पत्रे बनावट असून त्याची कुठेही नोंद नाही. नीरव मोदी याच्या कंपनीने ६,४९८ कोटी रुपये या फसवणुकीद्वारे मिळविले आहेत आणि या गुन्ह्य़ाच्या रकमेतून परदेशात व्यवसाय तसेच मालमत्ता खरेदी केल्या आहेत. त्यामुळे त्याची चौकशी करण्यासाठी ही प्रक्रिया आवश्यक असल्याचे संचालनालयाने अर्जात म्हटले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Court permission to inquire about nirav modis foreign assets