जगाला करोना विषाणूजन्य साथीचा वेढा पडला असताना, एकूण मंदावलेल्या अर्थचक्रात इंधन मागणीही घटल्याने, खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठी घसरण मंगळवारी दिसून आली. अमेरिकी बाजारात डब्ल्यूटीआय क्रूडचे वायदा व्यवहार शून्याखाली उणे किमत गाठताना दिसले, तर लंडनच्या बाजारात ब्रेन्ट क्रूडचे वायदा व्यवहारही १८ वर्षांपूर्वीच्या तळात प्रति पिंप २० डॉलरखाली रोडावले. मात्र असे असतानाही, मागील ३६ दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या किमती त्याच पातळीवर गोठलेल्या कशा, असा सवाल केला जाऊ लागला आहे.

आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत लक्षणीय घसरण सुरू असताना, गत १६ मार्चपासून भारतात पेट्रोल-डिझेलच्या किमती या आहे त्या पातळीवर गोठलेल्या आहेत. उलट एप्रिलच्या प्रारंभापासून राज्यामध्ये पेट्रोल-डिझेल विक्रीवर प्रति लिटर एक रुपया अतिरिक्त कर लागू झाल्याने किमती वाढल्या आहेत. देशव्यापी टाळेबंदीमुळे आधीच मोठे नुकसान सोसत असलेल्या मालवाहतूकदारांची संघटना ‘ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस (एआयएमटीसी)’ने निदान इंधनाच्या किमती कमी करून तरी सरकारने या परिस्थितीत दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे.

अमेरिकी बाजारात डब्ल्यूटीआय क्रूडचे मे महिन्याचे वायदा व्यवहाराने तर मंगळवारी उणे (-) ३७.६३ पातळी गाठली. मात्र भारताकडून आयात होणाऱ्या खनिज तेलाच्या किमती या अमेरिकी खनिज तेलापेक्षा, ओमान, दुबई आणि ब्रेन्ट क्रूडच्या किमतीवरून निर्धारित होत असतात. मंगळवारच्या व्यवहारात अमेरिकी तेलाच्या किमतीत गटांगळ्या खात पार शून्याखाली गेल्या. तर भारताच्या दृष्टीने कळीच्या असलेल्या ब्रेन्ट क्रूडच्या किमतीही चालू वर्षांत आजपावेतो ६० टक्क्यांहून अधिक घसरून, प्रति पिंप २० ते २१ डॉलरच्या टप्प्यांत रोडावल्या आहेत. मागील १८ वर्षांतील या तेलाच्या किमतीत दिसून आलेला हा तळ आहे. या मे महिन्याच्या वायदा किमती असून, जूनसाठी त्या डब्ल्यूटीआय क्रूडसाठी २१ डॉलर तर ब्रेन्ट क्रूडसाठी २५ डॉलर अशा आहेत.

उल्लेखनीय म्हणजे अनेक देशांत अर्थचक्र ठप्प असल्याने, त्यांच्याकडील इंधन साठा आधीच खूप मोठा आणि अतिरिक्त साठवणुकीच्या सुविधा अनुपलब्ध आहेत. दुसरीकडे तेल उत्पादक राष्ट्रांनी गेल्या महिनाअखेरीस जाहीर केलेली १० दशलक्ष पिंपाची उत्पादन कपात ही पुरवठा नियंत्रित राखण्याच्या दृष्टीने अत्यल्प आहे. मागणी-पुरवठा संतुलन जोवर ताळ्यावर येत नाही तोवर किमती पडतच राहतील, असे क्रिसिलने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या टिप्पणीत म्हटले आहे. एरव्ही प्रति दिन १०० दशलक्ष पिंप असलेली जागतिक तेलाची मागणी ही एकपंचमांश म्हणजे दिवसा २० दशलक्ष पिंपावर आली आहे.

तेलाच्या किमतीतील या विक्रमी घसरणीने भांडवली बाजारातील व्यवहारांवर नकारात्मक परिणाम साधला आणि स्थानिक बाजारात सेन्सेक्स-निफ्टी हे निर्देशांक जवळपास तीन टक्क्यांनी गडगडले तर चलन बाजारात रुपयानेही अमेरिकी डॉलरपुढे ३० पैशांच्या घसरणीने ७६.८३ या सार्वकालिक नीचांक स्तरावर लोळण घेतली.

जागतिक बाजारात सर्वत्र सुरू असलेल्या पडझडीचे प्रतिबिंब स्थानिक भांडवली बाजारातही उमटले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १,०११.२९ अंशांच्या घसरणीसह ३०,६३६.७१ या पातळीवर, तर निफ्टी निर्देशांक २८०.४० अंशांच्या घसरणीने ८,९८१.५० या पातळीवर दिवसअखेर स्थिरावला. सेन्सेक्समधील ३० पैकी २७ समभाग घसरणीत राहिले.