नवी दिल्ली : प्रमुख तेल उत्पादक देशांनी उत्पादन वाढविल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाच्या किमती गेल्या दोन दिवसांत कमालीच्या घसरून दिलासादायी स्तरावर आल्या आहेत. मंगळवारच्या व्यवहारात खनिज तेलाच्या किमती प्रति पिंप ७२ डॉलरवर आलेल्या दिसून आल्या.  परिणामी भारतात परकी चलन विनिमय मंचावर डॉलरच्या तुलनेत रुपया सावरत, पंधरवडय़ाच्या वरच्या टप्प्यावर पोहोचला आहे.

लिबियातून खनिज तेल निर्यात खुली झाली आहे. तसेच रशियातूनही तेल उत्पादन सुधारणा झाली आहे. त्याचबरोबर अन्य प्रमुख तेल उत्पादक देशही आता वाढीव इंधन उत्पादन घेऊ लागले आहेत. यामुळे खनिज तेलाचे दर गेल्या आठवडय़ाभरात तब्बल १० टक्क्यांनी कमी झाले आहेत. इंधनाच्या किमती एप्रिल २०१८ पासून आता किमान स्तरावर आल्या आहेत. तत्पूर्वी खनिज तेलाच्या किमती साडेतीन वर्षांच्या उच्चांकावर होत्या.

घसरत्या खनिज तेलाच्या किमतीचा परिणाम मंगळवारी रुपयाच्या हालचालीवर तीव्रतेने नोंदला गेला. स्थानिक चलन सोमवारच्या तुलनेत अमेरिकी चलनासमोर १२ पैशांनी भक्कम होत ६८.४५ वर पोहोचले. परकी चलन विनिमय मंचावर रुपयाचा मंगळवारचा प्रवास हा त्याच्या गेल्या पंधरवडय़ातील उत्तम म्हणून नोंदला गेला. व्यवहारात ६८.२७ पर्यंत झेपावल्यानंतर रुपयात ०.१८ टक्क्यांची भर पडली.

या घडामोडींचा परिणाम देशांतर्गत रोखे बाजारावरही झाला असून १० वर्षे मुदतीच्या रोख्यांवरील व्याज अर्ध्या टक्क्याने कमी होत ते वार्षिक ७.७५ टक्क्यांवर येऊन ठेपले आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाच्या किमती कमी होणे हे भारताला महागाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी पूरक गोष्ट ठरू शकेल. त्याचबरोबर चालू खात्यातील तूट आणि वित्तीय तुटीचे प्रमाणही यामुळे कमी होऊ शकेल.

’  अभिजित डे

वरिष्ठ निधी व्यवस्थापक,  बीएनपी पारिबा म्युच्युअल फंड