प्रत्येक बँकेकडून एटीएमच्या पुनर्भरणासाठी दिला जाणाऱ्या रोकडीचे प्रमाण वेगवेगळे असले, तरी जितकी गरज आहे तितकी पूर्णपणे भागविली जात नाही. देशभरातील २.०८ लाख एटीएममध्ये नोव्हेंबरपूर्वी सरासरी १२ लाख रुपयांची रोकड भरली जात असे, निश्चलनीकरणानंतर मार्चपर्यंत एटीएमसाठी नोटांचा पुरवठा निम्म्यावर आला. त्यापुढे मात्र त्यात सुधारणा नसल्याचा ‘कॅश लॉजिस्टिक्स असोसिएशन’च्या प्रवक्त्यांचा दावा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रिझव्‍‌र्ह बँकेकडे उपलब्ध आकडेवारीतून, रोकडरहित डिजिटल व कार्ड व्यवहारांचे प्रमाण फेब्रुवारीपर्यंत लक्षणीयरीत्या वाढत आले. त्यानंतर मात्र जशी नोटांची उपलब्धता वाढत गेली तसतसे रोखीतून व्यवहार करण्याकडे लोकांचा कल पुन्हा वाढत गेला. ही मोठी चिंतेची बाब आहे, अशी रिझव्‍‌र्ह बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने प्रतिक्रिया व्यक्त केली. नोव्हेंबरपासून जानेवारीपर्यंत एटीएममधून रोख काढण्याचे घटलेले प्रमाण हे मार्च २०१७ पर्यंत नोटाबंदीच्या पातळीवर २.२६ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, त्याउलट कार्डद्वारे होणारा विनिमय जो डिसेंबर २०१६मध्ये ०.५८ लाख कोटी रुपये कमाल पातळीवर पोहोचला होता, तो मार्च २०१७ मध्ये ०.३६ लाख कोटीपर्यंत खालावला आहे, असे रिझव्‍‌र्ह बँकेची आकडेवारी सांगते.

नोटाबंदीचा अनुभव आणि नित्याचा बनलेला एटीएमचा खडखडाट पाहता, बँक खात्यात पैसे राखण्यापेक्षा गरजेपेक्षा अधिक रोकड स्वत:पाशी बाळगण्याची लोकांची प्रवृत्ती वाढली आहे. यातून रोखीच्या चणचणीच्या स्थितीला तीव्र रूप दिले आहे, अशी सहकारी बँकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने प्रतिक्रिया दिली.

रिझव्‍‌र्ह बँकेचे वरातीमागून घोडे

निश्चलनीकरणाच्या काळात तात्पुरते शुल्करहित झालेले क्रेडिट व डेबिट कार्डाद्वारे खरेदी विनिमय, मार्चपासून पुन्हा सशुल्क झाला. कार्डद्वारे विनिमय घटत जाण्याचे हे कारण आहेच. यूपीआय अ‍ॅपद्वारे लुबाडणुकीच्या घटना पाहता, ऑनलाइन आणि मोबाइल अ‍ॅपमार्फत होणारा विनिमय हा सुरक्षित नसल्याचाही लोकांची भावना बनली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रला यूपीआय घोटाळ्यामुळे २५ कोटींचा फटका बसला आहे आणि या बँकेचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांनी यूपीआयप्रणालीत राखलेल्या उणिवांसाठी रोखरहित व्यवहारांसाठी समन्वयक संस्था – एनपीसीआयलाचे टीकेचे धनी बनविले आहे. या पाश्र्वभूमीवर रिझव्‍‌र्ह बँकेने सायबर सुरक्षिततेसाठी तज्ज्ञांचा कार्यदल स्थापित केला आहे. रिझव्‍‌र्ह बँकेचे हे पाऊल म्हणजे वरातीमागून घोडे असल्याची टीका महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉइज फेडरेशनचे सरचिटणीस देवीदास तुळजापूरकर यांनी केली. या कार्यदलाच्या स्थापनेतून डिजिटल व्यवहारप्रणालीत त्रुटी-उणिवा असल्याची रिझव्‍‌र्ह बँक कबुलीच देत आहे. म्हणजे आजवर ही सदोष प्रणाली वापरून फसवणूक झालेल्या लोकांचा गिनिपिग म्हणून वापर केला गेला, असा अर्थ काढता येईल, अशी तुळजापूर यांनी पुस्ती जोडली.

एटीएम उलाढाली पुन्हा नोटाबंदीपूर्व स्थितीला!

रिझव्‍‌र्ह बँकेकडे देशातील वाणिज्य बँकांच्या २.०८ लाख एटीएममधील व डेबीट कार्डद्वारे पीओएस विनिमयाची मार्च २०१७ पर्यंतची उपलब्ध तुलनात्मक आकडेवारी एटीएममधून रोख काढण्याचे प्रमाण पुन्हा निश्चलनीकरणापूर्वीच्या पातळीवर पोहोचल्याचे दर्शविते.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Currency shortage in atm
First published on: 12-05-2017 at 02:15 IST