ई-कॉमर्स व्यासपीठावर एकाच दिवसात गोंधळ घातलेल्या विक्रमी सवलतीतील खरेदी-विक्री व्यवहाराविरुद्धच्या तक्रारींचा पाऊस भारतीय ग्राहक मार्गदर्शन सोसायटीमध्येही पडला असून संबंधित संकेतस्थळ तसेच सहभागी उत्पादक कंपन्यांविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्याची तयारी सुरू झाली आहे.
फ्लिपकार्टने ‘बिग बिलियन डे’ घोषित करीत सोमवारी आपल्या व्यासपीठावरून उत्पादनांची ८० टक्क्यांपर्यंतच्या सवलतीतील विक्री अवलंबली. मात्र ऐन सणसमारंभांच्या कालावधीत संकेतस्थळावर खरेदीदारांच्या उडय़ा पडल्याने यंत्रणाही कोलमडून पडली.
या व्यवहारात अनेकांची फसगत झाल्याचा दावा करीत सोसायटीने नागपूरच्या नाझीर खान यांच्या तक्रारीचा पाढा वाचला आहे. खान यांनी सोमवारी कंपनीच्या संकेतस्थळावर मोटो ई आणि सॅमसंग कार्डसाठी नोंदणी केल्यानंतर ही मागणी रद्द करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
याबाबत सोसायटीचे अध्यक्ष यांनी सांगितले की, ई-कॉमर्स व्यासपीठावर सोमवारी झालेल्या गोंधळानंतर आमच्याकडे येणाऱ्या फसवणुकीच्या तक्रारी वाढल्या असून आम्ही खुद्द संबंधित संकेतस्थळ आणि उत्पादक कंपन्यांना पत्र लिहून ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर कार्यवाही सुरू करणार आहोत.
दरम्यान, फ्लिपकार्टने सोमवारच्या गैरसोयीबद्दल ग्राहकांची क्षमा मागितली असून पुढील वेळी आपण अधिक दक्षता घेऊ, असे जाहीर केले आहे. एकाच दिवसात १५ लाख खरेदीदारांनी विविध उत्पादनांसाठी मागणी नोंदविल्याने हे घडल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीचे संस्थापक सचिन व बिनी बन्सल यांनी सोमवारी १० तासांत ६०० कोटी रुपयांच्या वस्तू विकल्या गेल्याचे नमूद केले आहे.