‘जीएसटी’, ‘ब्रेग्झिट’चे व्यवसाय वाढीवर दुष्परिणाम अपरिहार्य – सायरस मिस्त्री | Loksatta

‘जीएसटी’, ‘ब्रेग्झिट’चे व्यवसाय वाढीवर दुष्परिणाम अपरिहार्य – सायरस मिस्त्री

दुग्धजन्य उत्पादन व्यवसायात उतरणार

‘जीएसटी’, ‘ब्रेग्झिट’चे व्यवसाय वाढीवर दुष्परिणाम अपरिहार्य – सायरस मिस्त्री
Share market : आज बाजार उघडल्यानंतर टाटा समुहातील प्रमुख कंपन्यांचे समभाग तीन ते पाच टक्क्यांनी कोसळले. मुंबई शेअर बाजारावरही याचा परिणाम दिसून येत असून सेन्सेकमध्ये घसरण नोंदविण्यात आली आहे.

‘ब्रेग्झिट’मुळे टाटा समूहाच्या युरोपातील पोलाद व्यवसाय संकटात असताना चहा व्यवसायावरदेखील विपरीत परिणाम होण्याची भीती टाटा समूहाचे अध्यक्ष सायरस मिस्त्री यांनी बुधवारी व्यक्त केली. येऊ घातलेल्या वस्तू व सेवा करामुळे (जीएसटी) चहा व्यवसायावर महागाईचा दबाव जाणवेल, असा त्यांनी कयास व्यक्त केला.

टाटा समूहातील चहा व्यवसाय असलेल्या टाटा ग्लोबल बेव्हरेजेस लिमिटेडची ५३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी कोलकत्यात पार पडली. कंपनीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी भागधारकांना संबोधित केले.

ब्रेग्झिट आणि जीएसटी आदींचा कंपनीच्या चहा व्यवसायावर अल्प कालावधीसाठी विपरीत परिणाम होण्याची शक्यता असून यातून महागाई वाढीची भीतीही असल्याचे मिस्त्री म्हणाले. जीएसटीचा एकूणच उद्योगक्षेत्राला यामुळे वाढत्या महागाईचे संकट उद्भवत असल्याचे त्यांनी नमूद केले. चहा व्यवसायावर जीएसटीचा संभाव्य परिणाम लक्षात घेता सरकारने या क्षेत्राकडे लक्ष देण्याची गरज मिस्त्री यांनी प्रतिपादन केली. दीर्घकालासाठी महागाईचा परिणाम सर्वच क्षेत्रांत जाणवू लागेल, असेही ते म्हणाले.

चहा व्यवसायाबाबत भारतातील परिस्थिती फारशी चांगली नसल्याचे नमूद करत मिस्त्री यांनी या व्यवसायात ६५ टक्के महसूल जागतिक स्तरावरून येतो, असे सांगितले. स्थानिक पातळीवर हा व्यवसाय विस्तारण्याच्या दिशेने संधी असून जागतिक स्तरावर मात्र या व्यवसायासाठी चिंताजनक स्थिती निर्माण होण्याची शक्यता त्यांनी वर्तविली. कंपनीच्या चीनमधील व्यवसायाची पुनर्रचना करण्याचे संकेतही त्यांनी दिले. कॉफी व्यवसायातही वाढीव महसुलाचे उद्दिष्ट राखण्यावर त्यांनी भर दिला.

ब्रेग्झिटमुळे युरोपातील व्यवसायाबाबत जोखीम निर्माण झाली असून समूहातील अन्य उद्योगांवर त्याचे पडसाद उमटतील, अशी मिस्त्री यांनी स्पष्ट शब्दात कबुली दिली.

दुग्धजन्य उत्पादन व्यवसायात उतरणार

चहा, कॉफी तसेच पेयजल व्यवसायात असलेल्या टाटा ग्लोबल बेव्हरेजेसने दूध व दुग्धजन्य उत्पादन निर्मितीत शिरकाव करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. भारतासारख्या देशात या व्यवसायाच्या   विस्तारास मोठी संधी असून बाटलीबंद पिण्याचे पाणीपुरवठा व्यवसायातही नव्याने शिरकावास पुरेसा वाव असल्याचे सायरस मिस्त्री म्हणाले. दुग्धजन्य उत्पादन व्यवसायात आयटीसीने नुकताच प्रवेश केला आहे. तर ब्रिटानियाही या व्यवसायासाठी उत्सुक आहे.

 

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-08-2016 at 02:35 IST
Next Story
संगणकांची मागणी रोडावली; तिमाही आयातीत २.२ टक्के घसरण