डि मार्टच्या शेअरची सव्वा वर्षात 299 रुपयांवरून 1600 रुपयांवर झेप

एक लाख कोटी रुपयांच्या भांडवली मूल्याच्या प्रतिष्ठित क्लबमध्ये डी मार्ट या रिटेल स्टोअर्सची पालक कंपनी अॅव्हेन्यू सुपरमार्केट हिचा समावेश झाला आहे

प्रातिनिधिक छायाचित्र

एक लाख कोटी रुपयांच्या भांडवली मूल्याच्या प्रतिष्ठित क्लबमध्ये डी मार्ट या रिटेल स्टोअर्सची पालक कंपनी अॅव्हेन्यू सुपरमार्केट हिचा समावेश झाला आहे. या कंपनीच्या शेअरने 1,608 रुपये इतकी उच्चांकी पातळी गाठली आहे. त्यामुळे डि मार्टचं भांडवली बाजारातील मूल्य आज 1,00,171.80 कोटी रुपये इतकं झालं. गेल्या तीन आठवड्यामध्ये या शेअरने 20 टक्के वाढ अनुभवली आहे. विशेष म्हणजे मार्च 2017 मध्ये म्हणजे अवघ्या सव्वा वर्षांपूर्वी शेअर बाजारात ही कंपनी दाखल झाली त्यावेळी हा शेअर केवळ 299 रुपयांना उपलब्ध होता. विशेष म्हणजे ज्या दिवशी हा शेअर बाजारात दाखल झाला त्याच दिवशी तो 100 टक्क्यांनी वधारून 615 रुपये प्रति शेअर इतका महागला होता.

किमान किती शेअर्स कंपनीच्या प्रवर्तकांखेरीज जनतेकडे असावेत या संदर्भातल्या नियमांचं पालन करण्यासाठी गेल्या आठवड्यामध्ये अॅव्हेन्यू सुपरमार्केटचे प्रवर्तक राधाकिशन दमानी यांनी 62 लाख शेअर्स किंवा एक टक्के हिस्सा विकला होता. त्यानंतर डिमार्टच्या शेअरनं पुन्हा उचल खाल्ली आहे. “दमदार वाढ आणि चांगला नफा ही डि मार्टची वैशिष्ट्ये आहेत. डि मार्ट दुकानांच्या संख्येतही वाढ करत असून त्यामुळे कंपनीचा नफा वाढणार आहे. त्यामुळे येत्या काळात डि मार्टचा शेअरही चढा राहील,” असे मत एका विश्लेषकानं व्यक्त केलं आहे.

मार्चमध्ये संपलेल्या तिमाहीत डी मार्टनं 167 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता. एका वर्षांपूर्वीच्या तुलनेत ही 73 टक्क्यांची वाढ आहे. तर एकूण उत्पन्न या तिमाहीत गेल्या वर्षींच्या तुलनेत 22.5 टक्क्यांनी वाढून 3,810 कोटी रुपये झाले आहे. 2017-18 या आर्थिक वर्षात डि मार्टनं 24 आउटलेट्स वाढवली आहे. आउटलेट्सची संख्या वाढवणं हे आमचं उद्दिष्ट असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

ब्लुमबर्गच्या सांगण्यानुसार डि मार्टच्या शेअरवर लक्ष ठेवून असलेल्या 15 दलालांपैकी पाच जणांनी शेअर विकत घेण्याचा, आठ जणांनी विकण्याचा तर दोघांनी आहेत ते शेअर बाळगण्याचा सल्ला दिला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: D mart share price rose from rs 299 to rs 1600 in 15 months

ताज्या बातम्या