गौरव मुठे

भारताने २०२२ या आर्थिक वर्षांत ४० हजार कोटी डॉलर्स (साधारण ३०.५५ लाख कोटी रुपये) इतक्या वस्तुमाल निर्यातीचे उद्दिष्ट गाठल्याचे वृत्त बुधवारी सर्वत्र प्रसृत झाले. त्यामुळे दोन वर्षांतील देशाच्या नीचांकी परकीय गंगाजळी पातळीचे वास्तव काहीसे दुर्लक्षित झाले. ही परकीय गंगाजळी मार्च महिन्यात ९.६४ अब्ज डॉलरनी आटत ६२२.२७५ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. सध्या रशिया-युक्रेन युद्धामुळे खनिज तेलाच्या पुरवठय़ात अडचणी निर्माण होण्याच्या भीतीने तेलाच्या किमतीने चालू महिन्यात १४ वर्षांचा उच्चांक मोडत १४० डॉलर प्रति बॅरलचा टप्पा गाठला आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारात समभाग विक्रीचा मारा करत चालू कॅलेंडर वर्षांत सुमारे २,२५,६४९ कोटी रुपयांचा निधी काढून घेतला आहे. याचबरोबर अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य कमी झाले नि तो प्रतिडॉलर जवळपास ७७ पर्यंत घसरला आहे. या सर्वाचा एकूण परिणाम परकीय गंगाजळीवर दिसून आला आहे.

Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
400 lakh crore market cap milestone of Mumbai Stock Exchange
विश्लेषण : ७५ हजारांचे शिखर… ४०० लाख कोटींचे बाजारभांडवल… शेअर बाजार आणखी किती तेजी दाखवणार?
HDFC Bank shares up 3 percent on rise in deposits loans
ठेवी, कर्जातील वाढीने एचडीएफसी बँक समभागाची ३ टक्क्यांनी झेप
The central government fiscal deficit reached Rs 15 lakh crore at the end of February
वित्तीय तूट १५ लाख कोटींवर; फेब्रुवारीअखेर वार्षिक उद्दिष्टाच्या तुलनेत ८६.५ टक्क्यांवर
  •   परकीय गंगाजळी म्हणजे काय?

प्रत्येक देशाला विविध मार्गानी कमी-अधिक प्रमाणात परकीय चलन प्राप्त होत असते. त्याच्या संचयाला परकीय गंगाजळी असे संबोधले जाते. त्यात प्रामुख्याने देशाकडून इतर देशांना होणारी निर्यात, अनिवासी भारतीयांकडून आपल्या देशात पाठवले जाणारे परकीय चलन, परदेशी गुंतवणूकदारांनी केलेली गुंतवणूक, भारतीय कंपन्यांनी परदेशी वित्तीय बाजारातून घेतलेले कर्ज यांचा समावेश होतो.

  • ती कशा प्रकारे साठवली, गुंतवली जाते?

रिझव्‍‌र्ह बँकेकडे परकीय गंगाजळी मुख्यत: अमेरिकी डॉलर, युरो, पौंड स्वरूपात साठवली जाते. परंतु हा संचय तसाच न ठेवता अमेरिका आणि इतर देशांनी जारी केलेल्या सरकारी रोख्यांमध्ये गुंतविला जातो. जेणेकरून त्यावर व्याज स्वरूपात उत्पन्न मिळते. मात्र उत्पन्न मिळविणे हा मुख्य उद्देश नसून परकीय गंगाजळी देशाच्या अर्थव्यवस्थेत वेगवेगळय़ा परिस्थितीत महत्त्वाची भूमिका बजावत असते. उदा. देशाला वस्तू आणि सेवांची आयात करण्यासाठी परदेशी चलनाची उपलब्धता करून देणे. त्याचबरोबर, डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्यास रिझव्‍‌र्ह बँक त्यात हस्तक्षेप करत डॉलरची विक्री करते. जेणेकरून डॉलरचा पुरवठा वाढल्यास डॉलरचे मूल्य कमी होऊन त्या तुलनेत देशाच्या चलनाचे मूल्य वधारते. देशावर असलेल्या कर्जाची परतफेडदेखील या गंगाजळीतून केली जाते. म्हणूनच तिचे देशाच्या विकासामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे.

  • परकीय गंगाजळीची आवश्यकता का असते?

देशात परदेशातून आयात करण्यात येणाऱ्या वस्तू आणि सेवांसाठी आयातीसाठी परकीय गंगाजळी आवश्यक असते. भारत इतर देशांकडून मोठय़ा प्रमाणात विविध वस्तू आणि सेवांची आयात करतो. देशाच्या आयात बिलात मुख्यत: खनिज तेल आणि सोन्याचा अधिक समावेश आहे. म्हणजेच या दोन्ही गोष्टींच्या आयातीवर देशाचा सर्वाधिक खर्च होतो. इतर देशांकडून जेव्हा एखादी वस्तू किंवा सेवेची आयात करतो तेव्हा त्यांना वस्तू आणि सेवांचे मूल्य डॉलरमध्ये द्यावे लागते. त्यामुळे जर आपल्याकडे पुरेशा प्रमाणात परकीय चलन उपलब्ध असेल, तर कुठलीही वस्तू आणि सेवांची आयात करताना समस्या उद्भभवत नाही. तसेच डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत होऊन महागाईदेखील नियंत्रणात राखता येते. देशाकडे पुरेशा प्रमाणात गंगाजळी उपलब्ध असेल तर परदेशी गुंतवणूकदार आणि निर्यातदार भारताशी आर्थिक व्यवहार करण्यात आश्वस्त होतात, कारण त्यांनी केलेली गुंतवणूक आणि केलेल्या निर्यातीची परतफेड परकीय चलनात मिळण्याचा त्यांना विश्वास असतो. तसेच जर देशावर एखादे आर्थिक अरिष्ट कोसळल्यास रिझव्‍‌र्ह बँकेच्या माध्यमातून बाजारात परकीय चलनपुरवठा केला जातो.

  •    पण मग यंदा ती घटण्याचे कारण काय?

गेल्या वर्षी भांडवली बाजार उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. तसेच गेल्या वर्षी करोनामुळे बहुतांश देशात निर्बंध कायम असल्याने जागतिक पातळीवर खनिज तेलाची मागणी कमी झाली होती. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाचे घसरलेले दर आणि त्यामुळे झालेली परकीय चलनाची बचत, परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय भांडवली बाजाराकडे वळविलेला मोर्चा यामुळे गेल्या वर्षी सप्टेंबर (२०२१) महिन्यात परकी चलन गंगाजळीने ६४२.४५३ अब्ज डॉलर अशी उच्चांकी पातळी गाठली होती. मात्र सध्याची परिस्थिती अगदी उलट झाली आहे. भांडवली बाजारात नवीन वर्षांत आलेली घसरण, खनिज तेलाच्या दराने गाठलेला उच्चांक आणि परदेशी संस्थामक गुंतवणूकदारांच्या निधीचे निर्गमन यामुळे परकीय गंगाजळीमध्ये मार्च महिन्यात सुमारे १० अब्ज डॉलरची घट झाली आहे.

  •    गंगाजळी आटल्याने पेचप्रसंग केव्हा ओढवला होता?

आर्थिक उदारीकरणापूर्वी म्हणजेच १९९०मध्ये देशाकडे फक्त ५.८ अब्ज डॉलर्स एवढीच परकीय गंगाजळी शिल्लक होती आणि यातून फक्त ४ आठवडे आयात करता येणे शक्य होते. शिवाय त्या वेळी देशावर कर्जाचा डोंगर उभा असल्याने कर्ज परतफेडीसाठी परकीय चलन उपलब्ध नव्हते. म्हणून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे (आयएमएफ) ६७ टन सोने गहाण ठेवून परकीय चलन उपलब्ध करण्यात आले होते. मात्र उदारीकरणानंतर परदेशी गुंतवणूकदारांनी भारतात गुंतवणुकीला सुरुवात केल्यानंतर परकीय गंगाजळी झपाटय़ाने वाढली.

  • सर्वाधिक परकीय चलनसाठा कोणत्या देशाकडे आहे?

परकीय गंगाजळीच्या बाबतीत चीन, जपान आणि स्वित्र्झलडनंतर भारताचा क्रमांक लागतो. चीनकडे सर्वाधिक परकीय चलनसाठा असून तो देश ३,३९८ अब्ज डॉलरसह आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ जपानकडे १४०५ अब्ज डॉलरचा चलनसाठा आहे. तर ११०९ अब्ज डॉलर परकीय चलन साठय़ासह स्वित्र्झलड तिसऱ्या क्रमांकावर आहे.

  •   परकीय गंगाजळीत वाढ कशी होते?

गंगाजळी वाढवायची असल्यास परकीय चलनाचे स्रोत वाढविण्यावर भर देणे आवश्यक आहे. केवळ परदेशी गुंतवणूकदारांवर अवलंबून न राहता, निर्यात अधिकाधिक वाढवून परकीय चलन देशात आणण्यावर भर असायला हवा. तसेच आयात कमी करून आपल्याला लागणाऱ्या वस्तू देशातच उत्पादित करून परकीय चलनाची बचत करता येणे शक्य असते. यामध्ये देशाचे परराष्ट्र धोरण महत्त्वाची भूमिका बजावते. केंद्र सरकारने याबाबत महत्त्वाची पावले उचलली आहेत. ‘मेक इन इंडिया’, ‘स्टार्टअप इंडिया’, ‘आत्मनिर्भर भारत’ यांसारख्या योजना परदेशी गुंतवणूक भारताकडे आकर्षित करून देशात वस्तू आणि सेवांच्या निर्मितीला मदत करू शकतात.

१९८० साली भारताची परकीय गंगाजळी ७ अब्ज डॉलर होती तर त्या वेळी चीनकडे केवळ २.५५ अब्ज डॉलरचा परकीय चलनसाठा होता. मात्र चीनने गेल्या चार दशकांपासून बदललेली आर्थिक धोरणे आणि ‘मेड इन चायना’च्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला निर्यातप्रधान केल्याने आज जागतिक पातळीवर परकीय चलन गंगाजळीच्या बाबतीत तो पहिल्या क्रमांकावर आहे.

महत्त्वाचे टप्पे..

वर्ष           परकीय गंगाजळी

२००४   १०० अब्ज डॉलर

२०१०   २०० अब्ज डॉलर

२०१४   ३०० अब्ज डॉलर

२०१७   ४०० अब्ज डॉलर

जून २०२०   ५०० अब्ज डॉलर

सप्टें. २०२१ +६०० अब्ज डॉलर