‘पीएमसी’सह २१ सहकारी बँकांच्या छोट्या खातेदारांना दिलासा

मुंबई: घोटाळेग्रस्त पंजाब अँड महाराष्ट्र (पीएमसी), रूपी, कपोल, मराठा सहकारी बँकेसारख्या देशभरातील एकूण २१ बँकांच्या त्रस्त ठेवीदारांना दिलासादायी बाब म्हणजे त्यांना त्यांच्या खात्यातून कमाल पाच लाखांपर्यंतची रक्कम परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘ठेव विमा आणि पत हमी महामंडळ अर्थात ‘डीआयसीजीसी’ने ठेवीदारांना त्यांच्या हक्काची रक्कम डिसेंबरअखेरपासून मिळू शकेल, असे पत्रकाद्वारे स्पष्ट केले. 

‘ठेव विमा महामंडळा’ने मंगळवारी उशिरा प्रसिद्धी पत्रकाद्वारे २१ बँकांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार या बँकांच्या ठेवीदारांना आता सर्व प्रकारच्या खात्यांमध्ये शिल्लक व व्याजासह मिळून जमा असलेल्या एकूण रकमेपैकी कमाल पाच लाख रुपयांपर्यंतची ठेव रक्कम २९ डिसेंबरपर्यंत मिळू शकणार आहे. ‘डीआयसीजीसी’ने संबंधित बँकांना पुढील ४५ दिवसांत दावे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या आधी विमा भरपाईसाठी पात्र खातेदारांची आवश्यक छाननी प्रक्रिया १५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत पूर्ण करण्यास सांगितले आहे. सर्व पात्र खातेदारांच्या दाव्यांची पडताळणी आणि काही अडचणी असल्यास त्यांचे निवारणाची ही संपूर्ण प्रक्रिया २९ नोव्हेंबर २०२१ पूर्वी पूर्ण करण्यास बँकांना सांगण्यात आले आहे. यांनतर ३० दिवसांमध्ये म्हणजे २९ डिसेंबरपर्यंत ठेवीदारांना कमाल पाच लाखांपर्यंत भरपाई बँकांकडून दिली जाणार आहे.

सरलेल्या ऑगस्टमध्ये संसदेने ‘ठेव विमा आणि पत हमी महामंडळ (दुरुस्ती) विधेयक, २०२१ मंजूर केले आहे. या सुधारीत कायद्यान्वये आर्थिक संकटातील, घोटाळ्यांमुळे अडचणीत सापडलेल्या एखाद्या बँकेवर रिझव्र्ह बँकेने निर्बंध लागू केल्यास त्या बँकेच्या ठेवीदारांना, सर्व शाखांमध्ये मिळून जमा असलेल्या एकूण रकमेपैकी कमाल पाच लाख रुपयांपर्यंतची ठेव रक्कम निर्बंध लागू केल्यापासून ९० दिवसांत परत मिळण्याचा मार्ग मोकळा केला.

महाराष्ट्रातील ११ बँका  

ठेव विमा भरपाईस पात्र २१ बँकांच्या  यादीमध्ये महाराष्ट्रातील ११ बँकांचा समावेश आहे : ५ पंजाब अँड महाराष्ट्र (पीएमसी) सहकारी बँक ५ रुपी सहकारी बँक ५ सिटी को-ऑपरेटिव्ह बँक ५ कपोल को-ऑपरेटिव्ह बँक ५ मराठा सहकारी बँक ५ नीड्स ऑफ लाईफ को-ऑपरेटिव्ह बँक  ५ पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी बँक ५ श्री आनंद को-ऑपरेटिव्ह बँक लि. पुणे ५ मंथा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक ५ सर्जेरावदादा नाईक शिराळा सहकारी बँक ५ इंडिपेडन्स को-ऑपरेटिव्ह बँक लि. नाशिक. या बँकांच्या छोट्या ठेवीदारांना खात्यातील पाच लाखांपर्यंतची ठेव परत मिळविता येणार आहे.