मुंबई : जागतिक भांडवली बाजारात झालेली घसरण आणि इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या अग्रणी समभागात गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावल्याने भांडवली बाजारात सप्ताहअखेर दोन दिवसांच्या तेजीला लगाम बसला. शुक्रवारी दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ७१४.५३ अंशांच्या घसरणीसह ५७,१९७.१५ पातळीवर स्थिरावला. दिवसभरातील सत्रात सेन्सेक्सने ५७,१३४.७२ अंशांचा तळ बघितला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये २२०.६५ अंशांची घसरण झाली आणि तो १७,१७१.९५ पातळीवर बंद झाला.

अत्यंत अस्थिर बनलेल्या भांडवली बाजारावर सध्या बाह्य आणि अंतर्गत अशा दोन्ही घटकांचा प्रभाव दिसून येत आहे. बाह्य घटकांमध्ये जागतिक पातळीवर अमेरिकी भांडवली बाजारात मोठय़ा प्रमाणावर चढ-उतार सुरू असून त्याचे पडसाद देशांतर्गत भांडवली बाजारावर उमटत आहेत. दुसरीकडे बाजारावर परिणाम करणारा अंतर्गत घटक म्हणजे विदेशी संस्थामक गुंतवणूकदारांकडून समभाग विक्रीचा मारा कायम आहे, तर देशांतर्गत गुंतवणूकदार अधिक सक्रिय झाले असून बाजारात समभाग खरेदी करत आहेत. अशा दोन्ही घटकांच्या प्रभावामुळे बाजाराला निश्चित दिशा मिळत नसून तो अधिक अस्थिर बनला आहे, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे मुख्य गुंतवणूक धोरणकार व्ही. के. विजयकुमार यांनी नोंदविले.

महागाईवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक बनले आहे, अशी अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हने केलेली टिप्पणी म्हणजे मे महिन्यात तेथे व्याजदरात थेट अध्र्या टक्क्यांची वाढ केली जाण्याची शक्यता आहे, असेही विजयकुमार यांनी संकेत दिले. सेन्सेक्समध्ये स्टेट बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, इंडसइंड बँक, डॉ रेड्डीज, अ‍ॅक्सिस बँक, बजाज फिनसव्‍‌र्ह, आयसीआयसीआय बँक आणि इन्फोसिसच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली. तर मिहद्र अँड मिहद्र, भारती एअरटेल, मारुती, आयटीसी, एशियन पेंट्सचे समभाग तेजी दर्शवित होते.