भारताच्या आर्थिक विकासदराबाबत व्यक्त करण्यात आलेल्या चिंतेच्या वातावरणात गुंतवणूकदारांनी समभागांची विक्री केल्याने ‘सेन्सेक्स’ गुरुवारी ९३.६६ अंशांने घसरत १९,३२३.८०वर  येऊन ठेपला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा ‘निफ्टी’ ३५.५० अंश घसरणीसह ५,८७०.१० वर स्थिरावला.
कालच्या सत्रात १५० हून अधिक अंशांनी वधारणारा मुंबई निर्देशांक सकाळच्या सत्रात ८० हून अधिक अंशवाढीने मार्गक्रमण करीत होता. त्यामुळे दिवसभरात तो १९,५०४.४० च्या उच्चांकाला जाऊन भिडला. व्यवहाराचे सत्र संपुष्टात येता येता मात्र त्यात घसरण नोंदली गेली.
‘सेन्सेक्स’मध्ये रिलायन्स, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, एचडीएफसी, आयटीसी, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र, टीसीएस, हिंदुस्थान यूनिलिव्हर, भेल असे बडे समभाग यावेळी घसरले. ३० पैकी २१ समभागांचे मूल्य कमी झाले.
महिन्यातील व्यवहारांचा आज अखेरचा दिवस असल्याने गुंतवणूकदारांनी अखेरच्या अध्र्या तासात नफेखोरीचा मार्ग अवलंबिला. त्यातच १२ व्या पंचवार्षिक योजनेत विकासाचा दर ८ टक्क्यांपर्यंत खाली खेचल्याच्या चिंतेचीही जोड  मिळाली.