नवी दिल्ली, : आंतरराष्ट्रीय पातळीवरील तेलाच्या वाढत्या किमतीमुळे देशांतर्गत पातळीवर सोमवारी डिझेलच्या दरात पुन्हा एकदा लिटरमागे २५ पैशांची वाढ केली गेली. २४ सप्टेंबरपासून डिझेलच्या दरातील ही सलग तिसरी वाढ असून ते एकूण ७० पैशांनी महागले आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर तेलाच्या किमती साडेतीन वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचल्याने येत्या दिवसात पेट्रोल-डिझेलच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. भारताकडून मुख्यत: आयात होणाऱ्या ब्रेंट क्रूड तेलाचे दर प्रति पिंप ७८ डॉलरवर गेले आहेत. दरवाढीनंतर डिझेल मुंबईत लिटरमागे ९६ रुपये ९४ पैसे झाले आहे. पेट्रोलच्या दरात तूर्त कोणतीही वाढ झाली नसली, तरी मुंबईत त्यासाठी सध्या लिटरमागे १०७ रुपये २६ पैसे मोजावे लागत आहेत.



