पुणे : सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रने नव्या युगाची पावले ओळखत नवीन डिजिटल सुविधांची घोषणा केली. महाबँकेने महाबँक डिजिटल रिवॉर्ड, रोख काढण्याची कार्डरहित सुविधा, ई-रुपी, पेन्शनरांसाठी ऑनलाईन फॉर्म-१६ मिळविण्यासारख्या विविध योजना सुरू केल्या आहेत. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक ए एस राजीव यांनी नवीन योजनांचे अनावरण केले. यावेळी बँकेचे कार्यकारी संचालक हेमंत टम्टा देखील उपस्थित होते. 

बँकेने दिलेल्या कर्जांवर सातत्याने नियंत्रण ठेवून त्यांच्या गुणवत्तेचे विश्लेषण करण्यासाठी बँकेने कर्मचाऱ्यांसाठी ‘हॉकआय’ हे स्वयंचलित ताण विश्लेषक उपयोजनही प्रस्तुत केले आहे. तर ‘एनपीसीआय’शी समन्वय साधून त्यांच्या ‘एन्थ रिवार्ड्स’ संकेतस्थळावरून बँकेच्या ग्राहकांना विविध डिजिटल विनिमयांवर बक्षिसरूपी प्रोत्साहनाची योजना पुढे आणली आहे.