मुंबई : इतिहासातील सर्वात मोठय़ा समभाग विक्रीच्या सफलतेनंतर, भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) समभागाने मंगळवारी भांडवली बाजारातील पदार्पणाला पॉलिसीधारकांसह गुंतवणूकदारांची निराशा केली. मोठय़ा फायद्याच्या आशेने गुंतवणूक करणाऱ्यांना हा समभाग सूचिबद्धतेला ८ टक्क्य़ांनी गडगडल्याचे पाहावे लागले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘एलआयसी’च्या समभागांच्या भांडवली बाजारातील सूचिबद्धतेकडे सर्वाचे लक्ष लागले होते. गेल्या आठवडय़ात ‘आयपीओ’द्वारे भांडवली बाजारातून २०,५५७ कोटी रुपयांची विक्रमी भांडवल उभारणी ‘एलआयसी’ने केली होती. या भागविक्रीसाठी जवळपास २.९५ पट अधिक भरणा गुंतवणूकदारांकडून केला गेला आणि गुंतवणूकदारांकडून ४३,९३३ कोटी रुपये गोळा झाले होते.

प्रति समभाग ७४ रुपयांचे नुकसान

प्रारंभिक भागविक्रीनंतर प्रति समभाग ९४९ रुपये किमतीला हा समभाग गुंतवणूकदारांनी मिळविला होता. मात्र जशी अपेक्षा केली जात होती त्याप्रमाणे भावातील मोठय़ा मुसंडीसह सूचिबद्धता होण्याऐवजी समभागाने ८ टक्के घसरणीसह सुरुवात करीत गुंतवणूकदारांची निराशा केली. समभागाने मंगळवारी मुंबई शेअर बाजारात ८७२ रुपयांवर, म्हणजेच वितरित किमतीच्या तुलनेत ८१.८० रुपयांची तूट दर्शवीत समभागाने व्यवहाराला सुरुवात केली. दिवसभरातील व्यवहारात या समभागाने ८६०.१० रुपयांचा किमतीतील तळ गाठला. दिवस सरताना प्रति समभाग ७३.५५ रुपयांच्या तोटय़ासह म्हणजेच ७.७५ टक्के घसरणीसह ८७५.४५ रुपये पातळीवर तो स्थिरावला.

कार्यक्रमाला उत्सवाचे रूप

मुंबई शेअर बाजाराच्या इमारतीतील ‘आंतरराष्ट्रीय परिषद सभागृहा’त मंगळवारी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या एलआयसीच्या समभाग सूचिबद्धतेच्या कार्यक्रमाला उत्सवाचे रूप होते. या सोहळय़ाला केंद्रीय अर्थमंत्रालयातील ‘दीपम’ विभागाचे सचिव तुहिन कांता पांडे, एलआयसीचे अध्यक्ष एम आर कुमार यांच्यासह मुंबई शेअर बाजाराचे प्रमुख आशीष चौहान आणि अधिकारी वर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित होता.

पॉलिसीधारकांना माफक तोटा

एलआयसीच्या भागविक्रीत सहभागी पॉलिसीधारक आणि किरकोळ गुंतवणूकदारांना अनुक्रमे प्रति समभाग ६० रुपये आणि ४५ रुपये सूट देण्यात आली होती. म्हणजेच त्यांनी अनुक्रमे ८८९ रुपये आणि ९०४ रुपये किमतीने एलआयसीचे समभाग मिळविले होते. पदार्पणाला समभाग घसरणीसह बंद झाल्याने पॉलिसीधारकांना आणि किरकोळ गुंतवणूकदारांना अनुक्रमे प्रति समभाग १३.५५ रुपये आणि ३३.५५ रुपये तोटा झाला आहे. मंगळवारच्या समभागाच्या बंदभावानुसार एलआयसी इंडियाचे बाजारभांडवल ५,५३,७२१ कोटींवर पोहोचले आहे.

भांडवली बाजारातील अस्थिरतेमुळे समभागाचे कमकुवत पदार्पण झाले आहे. मात्र गुंतवणूकदारांनी दीर्घकाळासाठी एलआयसीचे समभाग आपल्या भागभांडारात राखून ठेवावेत. 

– तुहिन कांता पांडे, सचिव, ‘दीपम’ विभाग,  केंद्रीय अर्थमंत्रालय

बाजार परिस्थितीत जसजशी सुधारणा होईल त्याप्रमाणे एलआयसीच्या समभागांच्या किमतीत सुधारणा होईल. ज्या पॉलिसीधारकांना किंवा गुंतवणूकदारांना एलआयसीचे समभाग प्रारंभिक समभाग विक्रीच्या माध्यमातून मिळाले नाहीत त्यांच्यासाठी ते यातून समभाग खरेदी करू शकतील. दीर्घावधीत समभागाची कामगिरी निराशाजनक राहील, असे कुठलेही कारण सध्या दिसत नाही. 

– एम. आर. कुमार , अध्यक्ष, एलआयसी

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Disappointment lic shares fall on launch investors loss profit ysh
First published on: 18-05-2022 at 00:02 IST