आर्थिक विषयावरील दिवाळी अंक

२०११ च्या अखेरपासून सुरू झालेल्या आर्थिक मंदीचे सावट अगदी यंदाच्या दिवाळीतही चांगलेच जाणवले. महागाईच्या निमित्ताने मिठाई, कपडे ते विद्युत उपकरणे यांच्या बाजारपेठेत तर ते जाणवलेच. पण अर्थव्यवस्थेशी निगडित भांडवली बाजार, सराफ्यांच्या पेढय़ा, बँक-विमा कंपन्यांची पारदर्शक कार्यालये येथेही ते सावट होतेच.

२०११ च्या अखेरपासून सुरू झालेल्या आर्थिक मंदीचे सावट अगदी यंदाच्या दिवाळीतही चांगलेच जाणवले. महागाईच्या निमित्ताने मिठाई, कपडे ते विद्युत उपकरणे यांच्या बाजारपेठेत तर ते जाणवलेच. पण अर्थव्यवस्थेशी निगडित भांडवली बाजार, सराफ्यांच्या पेढय़ा, बँक-विमा कंपन्यांची पारदर्शक कार्यालये येथेही ते सावट होतेच. अशास्थितीत रसिकांसाठी यंदाचा वाचन फराळ गुंतवणुकीवर ताव मारणारा ठरला. दिवाळी अंक प्रकाशन व्यवसायातील अगदी ताज्या नियतकालिकांनी बचतीवर प्रकाश टाकून सध्याच्या बिकट देशांतर्गत स्थितीत गुंतवणूकदारांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे, त्यावर एक नजर..

‘अर्थपर्व”
केवळ गुंतवणूक आणि गुंतवणुकीवर भर देणारा यंदाचा दिवाळी अंक ‘अर्थपर्व’ने प्रकाशित केला आहे. यामध्ये शेअर बाजार, बँकांचे समभाग, ईटीएफ-ई धातू, बँकांमधील मुदत ठेवी, बांधकाम क्षेत्र आदीतील गुंतवणुकीवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
पायाभूत सेवा क्षेत्रावर भर देणाऱ्या सरकारच्या धोरणानंतर गाजलेल्या या क्षेत्रातील रोख्यांमधील गुंतवणूक जीवन भावसार यांनी सोदाहरणासह स्पष्ट केली आहे.
दैनंदिन जीवनातील अर्थनिगडित विनोदी किस्से व्यंगचित्रांच्या माध्यमातून रंगविले गेले आहेत. अर्थविषयक विविध पुस्तकांची समिक्षा तसेच अनुभवकथनालाही स्थान देण्यात आले आहे. पुण्याच्या वंदना धर्माधिकारी यांनी भावनिक गुंतवणूक या अनोख्या विषयाला यानिमित्ताने स्पर्श केला आहे.
म्युच्युअल फंड, पगारातून करवजावट, गृहनिर्माण क्षेत्र, रुपया तसेच शेअर, बँकांच्या मुदत ठेवी, बँकांचे शेअर, लोकप्रिय होत असलेला ईटीएफ हा गुंतवणूक पर्याय यावरही त्या त्या लेखकांनी लेखन केले आहे.
अर्थपर्व वर्षांतून दोनदा प्रसिद्ध होते. यंदाच्या दिवाळीतील त्यांचा अंक हा सलग तिसऱ्या वर्षांतील अंक आहे. यात ‘नो यूवर बँक’ म्हणून ‘आोरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स’चा परिचय करून देण्यात आला आहे.

‘बिझनेस’
‘बिझनेस’ या यंदाच्या दिवाळी अंकाने जगावेगळे, मात्र अर्थजगताशी निगडित वाचनीय मजकूर देण्याचा प्रयत्न केला आहे.
अमेरिकेतील कचरा समस्येवर चीनमधील महिलेने शोधलेले उत्तर ‘कचऱ्याची राणी’मध्ये देण्यात आले आहे.
पाळीव प्राण्याचेही वसतिगृह असते, असा शोध एका लेखाच्या माध्यमातून वाचकांना लागतो. प्राण्यांबद्दल असलेल्या आत्मियतेतून व्यवसाय उभारणीची सांगलीतील मुस्तफाची कहाणी स्पष्ट होते.
‘पितांबरी’चे रवींद्र प्रभुदेसाई यांनी विपणाचे सात ‘प’कार उदाहरणासह सांगितले आहेत. अर्थसंकटाने गाजलेल्या युरोपवर राम लाहिरी यांनी विवेचन केले आहे.
आम आदमी नाव निश्चित करण्यापूर्वीच या बिरुदाने अरविंद केजरीवाल यांचा प्रशासकीय अधिकारी ते राजकारणी व्हाया कार्यकर्ता हा प्रवास दाखविला गेला आहे.
आशियातील आणि आपल्या शेजारील भूतान या देशानेही आर्थिक संकटावर कसा उपाय शोधून काढला, हे गोव्याच्या प्रभाकर ढगे यांनी उकलून दाखविले आहे.
जल आणि कृषी क्षेत्रातील वृक्ष शेती उल्लेखनीय कार्याची दखलही दोन स्वतंत्र लेखांमध्ये घेण्यात आली आहे.
मोटरसायकली भाडय़ाने देण्याचा गोव्यातील पायलट प्रोजेक्ट कसा चालतो, हेही स्पष्ट करण्यात आले आहे. ७० वर्षांच्या व्यवसायावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

‘मनी प्लस”
‘मनी प्लस’चा यंदाचा दिवाळी अंक संपूर्ण भांडवली बाजारावर केंद्रीत होणार आहे. देशातील विविध भांडवली बाजारांची स्थापना, त्यांची उलाढाल आदी ‘शेअर बाजार : इतिहास व वाटचाल’ या लेखाच्या माध्यमातून स्पष्ट होते.
शेअर बाजारातील मराठी माणूस, बाजारातील गुंतवणुकीची कला व शास्त्र, येथील गुंतवणुकीचा फंडा आदी विषय यानिमित्ताने घेण्यात आले आहेत.
शेअर बाजारातील सध्याचीच योग्य गुंतवणूक असण्यावर भर देतानाच सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील आर्थिक सुधारणांच्या निमित्ताने भांडवली बाजारातील गुंतवणूक संधी काय आहे, हेही दर्शविण्यात आले आहे.
शेअर बाजारातील आणि सोने धातूतील गुंतवणूक याची तुलना करून देण्यात आली आहे. निवृत्तीवेतन योजनाही कसा अधिकाधिक परतावा देतात, हेही दर्शविण्यात आले आहे.
मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजार या देशातील प्रमुख भांडवली बाजाराच्या आर्थिक उलाढालीसह महत्त्वाचे निर्देशांक टप्पे तसेच त्यांची सविस्तर माहिती आकडेवारीत देण्यात आली आहे.
भांडवली बाजारावर नियामक देखरेख असणाऱ्या सेबीच्या कार्यपद्धतीवर अभ्यासपूर्ण लिखाण करण्यात आले आहे.
एकूणच शेअर बाजार व्यवसायाच्या माहितीसह त्यातील गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारा यंदाचा हा दिवाळी विशेषांक आहे.

‘उद्योगश्री’
उद्योजकता आणि विकास या विषयावर गेल्या तीन दशकांपासून ‘उद्योगश्री’ दिवाळी अंक प्रकाशित करीत आहे. यंदाच्या निमित्ताने त्याला अध्यात्माची जोड देण्यात आली आहे.
औद्योगिक संपन्नतेतून मुल्यांची घसरण होऊ नये यासाठी अध्यात्मकतेची बैठक कशी आवश्यक आहे, यावर विविध लेखकांनी आपली मते स्वानुभवासह मांडली आहेत. यासाठी लेखकांमध्ये व्यवस्थापन, व्यवसाय यासह साहित्य क्षेत्रातील लेखकांचा समावेश करण्यात आला आहे.
काही निवडक उद्योजकांची ओळखही यात घेण्यात आली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची यापूर्वी घेण्यात आलेली मुलाखत या अंकात समाविष्ट करण्यात आली आहे. हिंदुत्व व उद्योजक, सिंधी समाजातील उद्योजकता, उद्योगातील मराठी बाणाही यात दिसून येतो. उद्योजक साक्षरतेच्या दृष्टीने वाचकांना प्रेरित करेल, असे लेख यात आहेत. मुक्त अर्थव्यवस्थेत मराठी उद्योजकांना सेवा क्षेत्रात कार्य करण्यास कशी उपयुक्त संधी आहे, हे मॅक्सेलचे नितीन पोतदार यांनी मांडले आहे.
विनोदी रेखाचित्राच्या आधारे मुलानी यांनी वाचकांची ‘हसवणूक’ करण्याचा प्रयत्न केला आहे. मुळचे काहीतरी व्यवसाय असणाऱ्या संतांची ओळखही करून देण्यात आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Diwali magazines on commerce

ताज्या बातम्या