मुंबई : डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण कायम असून चालू आठवडय़ात सलग दुसऱ्यांदा रुपयाने नवीन नीचांक नोंदविला. बुधवारी डॉलरमागे आणखी ३७ पैशांनी घसरून इतिहासात प्रथमच रुपयाने ८१.९० ही नीचांकी पातळी गाठली. भांडवली बाजारात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून अविरतपणे समभाग विक्रीचा मारा कायम आहे. परिणामी देशांतर्गत भांडवली बाजारातदेखील मोठी घसरण झाल्याने रुपया अधिक कमजोर झाला आहे. सत्रादरम्यान प्रथमच चलन ८२ रुपयांच्या उंबरठयावर पोहोचले.

आंतरबँक परकीय चलन बाजारात बुधवारच्या सत्रात रुपयाने ८१.९० या नीचांकापासून व्यवहारास सुरुवात केली. दिवसअखेरीस ३७ पैशांची तूट दर्शवत रुपयाचे मूल्य प्रति डॉलर ८१.९० या सार्वकालिक नीचांकपदी जाऊन स्थिरावले. सत्रादरम्यान ते ८१.९३ पातळीपर्यंत गडगडले होते. मंगळवारच्या सत्रात रुपया १४ पैशांची वाढ दर्शवत रुपयाचे मूल्य प्रति डॉलर ८१.५३ पातळीवर स्थिरावले होते. जगभरात सर्वत्रच बडय़ा गुंतवणूकदारांची जोखीमयुक्त मालमत्तांमधून माघार सुरू असून, तुलनेने सुरक्षित पर्यायांकडे त्यांचा पैसा वळला आहे. परिणामी सर्वच प्रमुख जागतिक चलनांचा तीव्र स्वरूपात मूल्य ऱ्हास सुरू असून, डॉलर निर्देशांक ०.४३ टक्क्यांनी वाढून सार्वकालिक उच्चांकी ११४.५९ अंशांवर पोहोचला आहे. अमेरिकेत रोख्यांच्या परतावा दरात सुरू असलेली उसळी हे अमेरिकी डॉलरला मिळत असलेल्या मजबुतीचेच प्रतिबिंब आहे.

घसरणीचे मुख्य कारण काय?

भांडवली बाजारातून परकीय गुंतवणूक अर्थात डॉलरच्या निर्गमनाने रुपयाच्या विनिमय मूल्यावर ताण आणला आहे. अमेरिकेतील अभूतपूर्व चलनवाढीचा स्तर व परिणामी अमेरिकी मध्यवर्ती बँक- फेडरल रिझव्‍‌र्हकडून व्याजदरात होत असलेल्या वाढीचे मोठे दुष्परिणाम भारताच्या भांडवली बाजारावर स्पष्टपणे दिसत आहेत. अमेरिकेतील फेडरल रिझव्‍‌र्हच्या व्याज दरवाढीमुळे तेथील रोखे व इतर गुंतवणुकींवरील परतावा वाढत असल्याने भारताच्या बाजारातून परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार निधी काढून घेत आहेत.

घसरत्या रुपयाचे परिणाम काय?

  • इंधन आणि ऊर्जा खर्चात वाढ- आयातदारांना आयात केलेल्या वस्तूंची देणी ही आता पूर्वीपेक्षा सात-आठ टक्के अधिक अमेरिकी डॉलर खरेदी करून भागवावी लागत आहेत. यातून वस्तूंची आयात महागली आहे आणि घसरत्या रुपयांतून ती आणखी महागणार आहे. देशाच्या आयातीचा मोठा हिस्सा व्यापणाऱ्या खनिज तेलाबरोबरच, खाद्यतेल, नैसर्गिक वायू, कोळसा, कोक, रासायनिक खते यांच्या आंतरराष्ट्रीय किमती जागतिक भू-राजकीय अस्थिरतेने वाढल्या आहेत, त्यात रुपयाच्या अवमूल्यनाची भर पडली आहे.
  •   महागाईचा भडका : जर रुपयाची पाच टक्क्यांनी घसरण झाली तर महागाई दरात सुमारे २० आधार बिंदू थेट वाढीचा प्रत्यक्ष परिणाम होतो. रिझव्‍‌र्ह बँकेने एप्रिलमध्ये पतधोरण मांडताना हा सह-परिणाम स्पष्ट केला होता. महागाई दर हा रिझव्‍‌र्ह बँकेसाठी सुसह्य ठरेल अशा पातळीच्या वरच्या टोकाला म्हणजे सहा टक्क्यांहून अधिक राहिला असून, ऑगस्टमध्ये तो सात टक्क्यांच्या पातळीवर पोहोचला. इंधनाचे दर अधिक महाग झाल्याने मालवाहतुकीचा खर्च वाढतो. ज्या परिणामी दैनंदिन वापराच्या वस्तू आणि सेवांच्या किमती वाढून सर्वसामान्यांचे महिन्याचे आर्थिक गणित कोलमडत आहे.
  •   परदेशी शिक्षण व प्रवास महाग : परदेशी शिक्षण संस्थांचे शैक्षणिक शुल्क, तेथील निवास व शिक्षण साहित्यावरील खर्चणाऱ्या प्रत्येक डॉलरमागे फक्त जास्त रुपये मोजावे लागत आहेत, इतकेच नाही तर रिझव्‍‌र्ह बँकेकडून व्याजदरात वाढ होत असल्यामुळे शैक्षणिक कर्जेही महाग झाली आहेत.