‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ ही म्हण जरी असली तरी आधी बुद्धी जाते, मग भांडवल जाते ही म्हणदेखील आहे! ‘शेअर बाजारात एका वर्षांत दुप्पट पसे!’ ही कल्पना म्हणून छान वाटते. पण प्रत्यक्षात ती भूलथापच आहे. पण अशा भूलथाप देऊन हजारो लोकांना चुना लावणाऱ्यांची आणि त्यांच्याकडून फसवणूक करून घेणाऱ्यांचीही संख्या काही कमी नाही..
सुप्रसिद्ध लेखक कै. पु.ल. देशपांडे यानी आपल्या पुस्तकात हे वाक्य चपखलपणे वापरले आहे. तात्पर्य असे की, फसवणूक करून घेणारी मंडळी भरपूर संख्येने आहेत. तेव्हा फसवणूक करणाऱ्याची चलती असते.
शेअर बाजारात एका वर्षांत दुप्पट पसे!! कल्पना किती छान वाटते नाही! पण प्रत्यक्षात अशा भूलथापा देऊन हजारो लोकांना चुना लावणाऱ्यांची संख्या कमी नाही. बरे असे प्रकार मोठय़ा संख्येने घडूनही त्यापासून काही शिकण्याची मानसिकता लोकांकडे अभावानेच आढळते. अन्यथा शारदासारखी प्रकरणे घडतीच ना.  मात्र लोकसत्ताच्या अर्थविषयक पुरवण्यांचा वाचक वर्ग नक्कीच प्रगल्भ झाला आहे हे येणाऱ्या पत्रव्यवहारावरून दिसून येते. प्रवीण लंके या ‘लोकसत्ता’च्या नियमित वाचकबंधूनी अहमदनगर येथील एका वृत्तपत्रात आलेली जाहिरात मला पाठवली आहे आणि लोकांच्या होणाऱ्या संभाव्य फसवणुकीला पायबंद घालण्याबाबत विनंती केली आहे. एक कुतूहल म्हणून मी सदर जाहिरात देणाऱ्या व्यक्तीला फोन लावून चौकशी करताच मिळालेली माहिती चिंताजनक होती. किमान पाच लाख रुपये या महोदयांकडे ठेवायचे. हे गृहस्थ ‘त्यांच्या नियमानुसार’ त्यातून व्यवहार करणार आहेत. वर्षांत तुमची रक्कम दुप्पट करून देण्याचा ‘मानस’ आहे बरं का..हमी नाही. बरे सज्जनपणा तरी किती म्हणावा? फायदा झाला तर ५० टक्के फायद्याची रक्कम त्यांना द्यायची. नुकसान झाले तर १०० टक्के जबाबदारी त्यांची. किती गोंडस वाटते ना? पण हे सर्व तोंडी बरे का! याबाबत काही लिखित स्वरूपाची कागद किंवा माहिती पत्रके पाठवाल का, असे विचारताच तशी काही माहितीपत्रे नाहीत असे उत्तर मिळाले. सगळा बोलघेवडेपणा. कारण वचने किम दरिद्रता!! बरे हे पसे कुठे गुंतवणार वगरे विचारताच ‘‘तुमचा ब्रोकरशी काही संबंध येणार नाही. कारण ते पसे तुम्ही आमच्याकडे द्यायचे आहेत’’ हे उत्तर. बरे तुम्ही सेबीकडे नोंदणीकृत आहात का असे विचारताच उत्तर मिळाले की होय. नाव विचारताच सेबीच्या वेबसाइटवर पाहिले असता व्यक्तीच्या नावे उपदलाल म्हणून नोंदणी आहे, पण हे कारभार करणार ते मात्र वेगळय़ाच नावाने! हीच खरी मेख आहे. ‘‘जगात एवढा परतावा कुठेच मिळत नाही’’ हे यांचे खास आकर्षण. मग यांना तरी अशी जादूची काय कांडी मिळाली आहे ते सांगत नाहीत. माझे नाव विचारताच असे उत्तर होते की तुम्ही तरी जाहिरातीत तुमचे नाव आणि पत्ता दिला आहे का? का ही लपवाछपवी? वर आणखी एक गाजर दाखवले आहे की गरज असल्यास तुमच्या मुलाला किंवा मुलीला इथे नोकरी मिळेल! अर्थात लोकांकडून पसे गोळा करून आणणे हा त्या नोकरीचा भाग असेल हे तर उघड आहे. जगातील अशा प्रकारची ही पहिलीच कंपनी आहे, असे जाहिरातीत अधोरेखित करून लिहिले आहे. जगातील किती देशात व शहरात जाऊन ही माहिती त्यांनी मिळवली आहे हे विचारायचे नाही! सॉफ्टवेअरद्वारे एक वर्षांत दुप्पट परतावा मिळवून देणारी ही काही गुरुकिल्ली या महोदयांकडे आहे, तर मग एखाद्या अहमदनगरातील बँकेकडून दहा लाख रुपये कर्ज घेऊन त्याचे एका वर्षांत २० लाख करायचे. या दहा लाखातील फायद्याच्या रकमेतून कर्जावरील व्याज १५ टक्के दराने दीड लाख रुपये झाले तरी नक्त फायदा साडे आठ लाख रुपये होतो आहे ना! मग तसे करायचे सोडून हे महाशय तुमच्याकडून प्रत्येकी पाच लाख का गोळा करीत आहेत हा विचार नगरवासीयांनी करायचा आहे आणि या योजनेकडे पाठ फिरवायची इतके तरी आपल्या हातात आहे ना? ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ ही म्हण जरी असली तरी आधी बुद्धी जाते, मग भांडवल जाते ही म्हणदेखील आहे!
बावधन पुणे येथून निखिल काजरेकर यांनी विचारले आहे की, कुठची कंपनी ‘अ’ वायदा गटात आहे, कुठची ‘झेड’ गटात आहे, त्याची माहिती कुठे मिळेल? अ,ब,एफ, टी, झेड वगरे वायदा गट हे फक्त बीएसईमध्येच आहेत. ज्याची माहिती  http://www.bseindia.com    या वेबसाईटवर असतेच, शिवाय इंग्रजी वित्तीय दैनिकांमध्ये शेअर्सचे भाव दिलेले असतात, ते गटानुक्रमेच असतात.