मुंबई : करोना महामारीत अग्रक्रमाने काम करणाऱ्यांच्या मालिकेत औषध विक्रेत्यांच्या सेवाही महत्त्वाची भूमिका बजावत असताना, याकामी २०० पेक्षा अधिक औषध विक्रेते करोना बळी ठरले, त्यांच्या योगदानाबाबत राज्य सरकारची अनास्था संतापजनक आहे. बिनीचे करोना योद्धे म्हणून मान्यता दिली जाऊन लसीकरणात तरी प्राधान्य दिले जावे अशी महाराष्ट्र औषध विक्रेता संघटनेने मागणी केली आहे.

सरकारने संपूर्णत: दुर्लक्ष केलेला औषधी विक्रेता जिवावर उदार होऊन २४ तास सेवा देत आहे. त्यामुळेच औषधी पुरवठा सुरळीत राहण्यास मोठी मदत झालेली आहे. प्रत्यक्ष करोना रुग्णांशी वा त्यांच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांशी येणाऱ्या संबंधांचे दुष्परिणाम औषधी विक्रेत्यांनाही भोगावे लागत आहेत, असे अखिल भारतीय आणि महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी सांगितले.  संघटनेने केलेल्या पत्रव्यवहार व त्यातील आर्जवांचीही शासनाने उपेक्षाच केली असल्याचे शिंदे म्हणाले.