कोळसा खाणींसाठी देशातील पहिली ई-लिलाव प्रक्रिया गुरुवारी सुरू झाली. यासाठीच्या http://www.mstcecommerce.com/auctionhome/coalblock संकेतस्थळाचे उद्घाटन केंद्रीय ऊर्जा व कोळसामंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते झाले.
कोळसा खाणींच्या लिलावामुळे येत्या ३० वर्षांसाठी साठे असलेल्या प्रमुख चार राज्यांना ७ लाख कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे. लिलावासाठी तांत्रिक निविदा दाखल करणाऱ्यांना ३१ जानेवारीपर्यंत या प्रक्रियेत भाग घेता येणार आहे, तर मान्यताप्राप्त बोलीधारक १२ फेब्रुवारी रोजी आपला दावा करू शकतील. संपूर्ण प्रक्रिया २३ मार्चपर्यंत पूर्ण होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील ३२ कोळसा खाणींसाठीची लिलाव प्रक्रिया लवकरच जारी केली जाईल, असेही गोयल यांनी सांगितले.
पहिल्या टप्प्यात २४ खाणींचे लिलाव यामार्फत होणार आहेत. १९९३ पासून वाटप झालेल्या २०४ खाणी सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्या होत्या. ई-लिलाव पद्धतीने लिलाव करण्याच्या अध्यादेशाला केंद्र सरकारने बुधवारीच मंजुरी दिली होती.