मुंबई : प्रमुख आयातीत जिन्नस महागणे, तापमानवाढीने गव्हाच्या उत्पादनात घट याच्या परिणामी सरलेल्या आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या चौथ्या तिमाहीत आर्थिक विकास दर हा ३.५ टक्क्यांपर्यंत मंदावल्याचे दिसून येईल, असा कयास आघाडीची पतमानांकन संस्था ‘इक्रा रेटिंग्स’ने सोमवारी व्यक्त केला. आधीच्या ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाही कालावधीतील ५.४ टक्क्यांच्या पातळीवरून तो खूप खाली घसरण्याचा तिचा अंदाज आहे.

देशातील करोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे संपर्क-केंद्रित सेवा व्यवसाय पुन्हा कार्यान्वित होण्यात आलेल्या अडथळय़ांचाही जाने ते मार्च २०२२ तिमाहीतील आर्थिकवृद्धीवर विपरीत परिणाम दिसेल, असे इक्राने म्हटले आहे. अगदी चौथ्या तिमाहीमध्ये मूळ किमतींवर (२०११-१२ च्या स्थिर किमतींवर) आधारित सकल मूल्यवर्धन देखील तिसऱ्या तिमाहीमधील ४.७ टक्क्यांवरून २.७ टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचे दिसू शकेल, असे या पतमानांकन संस्थेने स्पष्ट केले.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (एनएसओ) येत्या ३१ मे रोजी आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या चौथ्या तिमाहीतील अर्थव्यवस्थेतील वाढीचे आकडे प्रसिद्ध करणार आहे. इक्राच्या मुख्य अर्थशास्त्रज्ज्ञ अदिती नायर यांच्या मते, सरलेली चौथी तिमाहीचा काळ हा सर्वात आव्हानात्मक कालावधी होता. ओमायक्रॉन या नवीन प्रकारच्या विषाणूच्या उद्रेकाने तिसऱ्या लाटेच्या भडक्याने संपर्क-केंद्रित सेवांच्या व्यवसायांची गती रोखली आणि प्रमुख जिन्नस व कच्चा माल यांच्या उच्च किमतींमुळे उद्योगधंद्यांच्या नफ्याच्या प्रमाणावर या काळात लक्षणीय दबाव आला. तर उन्हाळय़ाला लवकर सुरुवात व मार्चमधील उष्म्याच्या तीव्र लाटेने गव्हाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम केल्याचे नायर यांनी सांगितले.