अर्थव्यवस्थेची वाढ सांख्यिकीदृष्टय़ा वाढताना दिसत असली तरी ती प्रत्यक्षात परावर्तित होत नसून देशाच्या विकासासाठी अद्याप बरेच काही करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मोदी सरकारच्या भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी बुधवारी येथे केले.
सिन्हा हे मोदी मंत्रिमंडळात अर्थ राज्यमंत्री असणाऱ्या जयंत सिन्हा यांचे वडिल आहेत.
सांख्यिकीदृष्टय़ा अर्थव्यवस्था मंदीतून बाहेर आली आहे; मात्र प्रत्यक्षात ती दिसत नसल्याचे कारण म्हणजे आम्ही त्याबाबतची बदलेली रचना होय, असे कारणही त्यांनी दिले. या मुद्दय़ावर चर्चा होणे गरजेचे असून अर्थव्यवस्था रुळावर आल्याची तुलना करू शकणारे सक्षम आकडे असायला हवेत, असा आग्रही त्यांनी यावेळी धरला. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादन दराची मोजपट्टी मोदी सरकारने सत्तेवर येताच बदलली.
याबाबत ते म्हणाले की, भारताचा विकास दर ७.५ अथवा ८ टक्के असेल, असे आपल्याला केवळ गेल्या वेळच्या आकडय़ांच्या तुलनेवरच म्हणता येणार नाही. तर त्यासाठी सदोष मोजपट्टीची गरज आहे. ही बदलण्यात आलेली पद्धत देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारालाही अद्याप उमगलेली नाही, अशा शब्दात त्यांनी अरविंद सुब्रमण्यन यांच्यावरही टीका केली.
रिझव्‍‌र्ह बँकेकडून पाहिजे त्या प्रमाणात व्याजदर कपात होत नाही, असेही ते म्हणाले. आपल्या अर्थमंत्रीपदाच्या कारकिर्दीचा उल्लेख करत सिन्हा यांनी अर्थ मंत्रालय व रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. बिमल जालान यांच्यात योग्य समन्वय होता, असे नमूद करत त्यांनी दोन संस्थांमध्ये असलेल्या मतभेदाचाही उल्लेख केला.