आर्थिक वर्षांसाठी राखण्यात आलेले ४० हजार कोटी रुपयांचे निर्गुतवणूक उद्दिष्ट पूर्ण करण्याची घाई आता सरकारला शेवटच्या तीन महिन्यांत झाली आहे. यासाठी इंडियन ऑइल, इंजिनीअर्स इंडिया या दोन कंपन्यांमधील निर्गुतवणूक प्रक्रिया याच महिन्यात तर भेलमधील सरकारी हिस्सा विक्री फेब्रुवारीमध्ये राबविण्यात येणार आहे.
वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अर्थ व्यवहार विभागाचे सचिव अरविंद मायाराम यांनी सांगितले की, सरकार चालू आर्थिक वर्षांतील निर्गुतवणुकीचे लक्ष्य निश्चितच पार करेल. यासाठी उपरोक्त कंपन्यांव्यतिरिक्त हिंदुस्थान एरोनॉटिक्समध्येही भागभांडवल ओतण्याची प्रक्रिया मार्चमध्ये केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. निर्गुतवणूक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उद्यमांचे ३,००० कोटी रुपयांचे ईटीएफही उपलब्ध केले जातील, असेही मायाराम यांनी सांगितले.
फेब्रुवारी २०१३ मध्ये संसदेत मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पात २०१३-१४साठी ४० हजार कोटी रुपयांच्या निर्गुतवणुकीचे लक्ष्य राखण्यात आले होते. पैकी आतापर्यंत सरकारी हिस्सा विक्रीतून केवळ ३ हजार कोटी रुपयेच उभारण्यात आले आहेत. यामध्ये सात सार्वजनिक उपक्रमांचा समावेश राहिला आहे.
सरकार आता इंडियन ऑइल, इंजिनीअर्स इंडियामधील प्रत्येकी १० टक्के हिस्सा विक्रीतून अनुक्रमे ५,००० व ५०० कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहे. तर याच प्रमाणातील हिंदुस्थान एरोनॉटिक्समार्फत ३,००० कोटी रुपये, तर भेलमधील ५ टक्के हिस्सा विक्रीतून २००० कोटी रुपये उभारण्यात येणार आहेत. याचबरोबर कोल इंडिया व आरआयएनएलमध्येही निर्गुतवणूक करण्यात येणार आहे.