यापूर्वी २००४ आणि २००९ मध्ये निवडणूक निकालांबाबतचे कयास सपशेल चुकीचे ठरून फसगत ओढवून घेणाऱ्या भांडवली बाजाराने यंदा निकालाविषयी अतिउत्साहाला मुरड घालून सबुरी दाखविली जावी, असा सावध इशारा ‘बँक ऑफ अमेरिका-मेरिल लिंच’ या प्रमुख जागतिक दलाल पेढीने दिला आहे. नवी दिल्लीत पंतपधानांच्या खुर्चीवर कोण विराजमान होतो यापेक्षा देशाच्या अर्थविषयक भवितव्यावरील जागतिक अर्थचक्रांच्या परिणामांकडे बाजाराने अधिक लक्ष द्यायला हवे, असेही तिने सुचविले आहे.
गेल्या आठवडय़ात या वित्तसंस्थेने देशातील आघाडीच्या २० गुंतवणूकदारांसह सिंगापूर येथे झालेल्या बैठकीत सावधगिरीचा इशारा देत, निवडणूक निकालांआधी त्यांनी आपल्या बाजारातील, विशेषत: चलन बाजारातील गुंतवणुका निकाली काढण्याचा सल्ला दिला आहे. आता तर ‘बँक ऑफ अमेरिका-मेरिल लिंच’ने  ‘बाजार तिसऱ्यांदा नशीबवान ठरेल काय?’ असा सवाल करणारा अहवालच प्रसिद्ध केला आहे. या सवालाच्या होकारार्थी उत्तराला, निवडणुकांचे निकाल, पावसावर ‘अल् निनो’ सावट आणि डॉलरचे मूल्य असे तीन अडसर असल्याचे या अहवालाचा मथळाच सूचित करतो.
मे २००४ मध्ये लोकसभा निवडणूक निकालांबाबत अपेक्षाभंगामुळे (भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा पराजय) भांडवली बाजार लगोलग सुमारे १५.९ टक्क्य़ांनी गडगडणे अथवा मे २००९ मध्ये ‘यूपीए’ सरकारला सलग दुसरी अनपेक्षित संधी देणाऱ्या निकालाने ‘सेन्सेक्स’ने १५ टक्क्य़ांची उसळी घेणे, अशा दोन्ही घटना निकालांबाबतचे बाजाराचे अंदाज चुकीचे ठरल्याचेच दर्शवितात.
‘बँक ऑफ अमेरिका-मेरिल लिंच’चे मुख्य अर्थतज्ज्ञ इंद्रनील सेनगुप्ता यांनी, २००४ आणि २००९ या दोन्ही लोकसभा निवडणुकांपूर्वीही जवळपास सर्वच मतदानपूर्व चाचण्यांनी भाजपच्या आघाडीचे कयास बांधले होते, याकडेही सूचकपणे लक्ष वेधले आहे.

२००४ आणि २००९ या दोन्ही लोकसभा निवडणुकांपूर्वीही जवळपास सर्वच मतदानपूर्व चाचण्यांनी भाजपच्या आघाडीचे कयास बांधले होते. पण दोन्ही वेळी प्रत्यक्ष निकालांनी बाजाराला सपशेल चकवा दिला..
’ इंद्रनील सेनगुप्ता
मुख्य अर्थतज्ज्ञ
बँक ऑफ अमेरिका-मेरिल लिंच’चे